

The hydraulic test of the main pipeline at Jayakwadi was successful.
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा नववर्षात २५०० मिमी व्यासाच्या नव्या पाणीपुरवठा योजनेतून शहराला पहिल्या टप्प्यात २०० एमएलडी पाणी दिले जाणार आहे. त्यासाठी या कामातील महत्त्वाचा टप्पा समाजल्या जाणाऱ्या जॅकवेलवरील महाकाय पंप आणि मोटारचे काम पूर्ण करण्यात आले असून, रविवारी (दि. १४) अॅप्रोच ब्रीजवरील ७५० मीटर लांबीच्या मुख्य जलवाहिनीची हायड्रोलिक चाचणीही यशस्वी झाली आहे. तर धरणातून सायफनिंग पद्धतीने पाणी घेण्यासाठी ६ लोखंडी ब्रीज व पाईप टाकण्याच्या कामाला गती देण्यात आली आहे.
शहरासाठी २७४० कोटी रुपये खर्चुन नवीन पाणीप-रवठा योजना राबविण्यात येत आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्यामार्फत जीव्हीपीआर कंत्राटदार कंपनीने कामाला सुरुवात केली. योजनेचे जवळपास ९० टक्के काम पूर्ण झाले आहे. पहिल्या टप्प्यात २०० एमएलडी पाणीपुरवठा करण्यासाठी डिसेंबरची मुदत देण्यात आली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोणत्याही परिस्थितीत शहराला २०० एमएलडी पाणीपुरवठा डिसेंबरपर्यंत करण्याचे आदेश दिले आहेत. त्याअनुषंगाने कामाला गती देण्यात आली असून, एक-एक काम पूर्ण केले जात आहे. जॅकवेलच्या अॅप्रोच ब्रीजवरील ७५० मीटर अंतरावरील २५०० मिमी व्यासाच्या मुख्य जलवाहिनीची रविवारी हायड्रोलिक चाचणी यशस्वी झाली. ही चाचणी करताना पाण्याचा दाब ४५० मिमीपर्यंत ठेवण्यात आला.
त्यानंतर सायफनद्वारे जायकवाडी धरणातून जॅकवेलमध्ये पाणी आणण्यासाठी सहा लोखंडी ब्रीज बसवून त्यावर प्रत्येकी दोन ३०० मिमी व्यासाच्या पाईप बसविण्यात आले आहेत. पंप, मोटार पॅनलसाठी केबल टाकण्याचे काम सुरू आहे. ४० मेनिफोल्डचे काम दहा दिवसांत पूर्ण होणार आहे. अॅप्रोच ब्रिजवर ट्रस्ट ब्लॉक टाकण्याचे काम सुरू आहे. मुख्य जलवाहिनीवर ५० मीटरचे पाच गॅप बाकी राहिले असून, दोन ठिकाणी बटरफ्लाय व्हॉल्व्ह बसविण्याचे काम सुरू आहे.
एमबीआरची हायड्रोलिक चाचणी
जलशुद्धीकरण केद्र येथील पाणी शुद्धीकरण पंप हाऊस येथे पाच पंप बसविण्यात आले आहेत. नक्षत्रवाडी येथे हायलेव्हल ११० लाख लिटर क्षमतेच्या एमबीआरची हायड्रो चाचणी सुरू आहे. नक्षत्रवाडी जलशुद्धीकरण केंद्र येथे इलेक्ट्रिक केबल अंथरण्याचे काम सुरू आहे. जायकवाडी व नक्षत्रवाडी येथील एक्सप्रेस फिडरचे काम २० डिसेंबरपर्यंत पूर्ण होईल. कोणत्याही परिस्थितीत २५ डिसेंबरपासून दोनशे एमएलडी पाण्याची चाचणी सुरू केली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.