

Royal feast for accused in Thane: Three policemen suspended
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्त सेवा : ड्रग्स प्रकरणातील आरोपींना एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात टेबल-खुर्ची लावून शाही मेजवानी देणे पोलिसांच्या अंगलट आले आहे. या प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर माध्यमांनी हा मुद्दा लावून धरला. त्यानंतर एनडीपीएस पथकातील तीन पोलिस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आल्याची माहिती पोलिस उपायुक्त प्रशांत स्वामी यांनी बुधवारी (दि२५) दिली. विशेष म्हणजे एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात हा प्रकार घडल्यानंतरही तेथील अधिकारी-कर्मचाऱ्यांना मात्र अभय देण्यात आले. ड्रग्सचे रॅकेटही त्यांच्याच हद्दीत सुरू असताना त्यांना पाठीशी घातल्याची जोरदार चर्चा आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, एमआयडीसी वाळूज भागात स्थानिक पोलिसांच्या नाकावर टिच्चून खान ड्रग्सचा गोरखधंदा चालवीत होता. त्याला स्थानिक राजकारणी संरक्षण देत होता. अनेकवेळा कारवाईत अर्थपूर्ण सहकायनि तडजोडी झाल्या. खानला पाठबळ मिळत असल्याने तो बिनबोभाटपणे धंदा चालवीत होता. मात्र, पोलिस निरीक्षक गीता बागवडे यांना माहिती मिळताच त्यांच्या पथकाने आरोपी बबन खानच्या गोदामावर छापा मारून सुमारे दोन किलो एमडी ड्रग्स पावडर जप्त केले.
याप्रकरणी पाच आरोपीना अटक करण्यात आली. मंगळवारी आरोपी एनडीपीएस पथकाच्या ताब्यात होते. आरोपीना रात्री वाळूज एमआयडीसी ठाण्यातील लॉकअपमध्ये ठेवण्यासाठी नेल्यावर तेथे खानच्या नातेवाईकांनी बाहेरून जेवणाचे पार्सल ठाण्यात आले. एका खोलीत टेबल-खुर्ची लावून शाही मेजवानी झाली.
आरोपींचे नातेवाईक जेवण वाढताना व्हिडिओत दिसत आहे. विशेष म्हणजे एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात एनडीपीएस पथकातील कर्मचाऱ्यांसमोर हा प्रकार घडला. दरम्यान, या प्रकरणात एनडीपीएस पथकातील तीन पोलिसांना निलंबित केल्याची माहिती उपायुक्त स्वामी यांनी दिली.
एनडीपीएस पथकाने ड्रग्सचे मोठे रॅकेट उघडकीस आणेल. मात्र एमआयडीसी वाळूज ठाण्यात आरोपींची शाही बडदास्त ठेवल्याच्या प्रकारामुळे नंतरही पथकावर आरोप होऊ शकतात. त्यामुळे या गुन्ह्याचा तपासही एनडीपीएस पथकाकडून काढण्यात आला. गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संभाजी पवार यांच्याकडे बुधवारी तपास वर्ग केल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.