

Sambhajinagar Encroachment removal campaign
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा: जालना रोड ते केंब्रीज रस्ता ६० मीटर रुंदीचा असून, यात मुख्य मार्गासह सर्व्हिस रोडचाही समावेश आहे. मात्र असे असतानाही महापालिकेने जालना रोडवर मुकुंदवाडी ते केंब्रीज यादरम्यानच सर्व्हिस रोडसाठी अतिक्रमण काढण्याची मोहीम हाती घेतली आहे.
महापालिकेच्या या भूमिकेवर नागरिकांनी आक्षेप घेतला असून, सामान्यांवर घाव आणि बड्यांना अभय का, असा सवालही उपस्थित केला आहे. सेव्हनहिलपर्यंत मोहीम राबवण्यात यावी, अशी मागणीही केली आहे.
महापालिकेने विकास आराखड्यातील सर्व रस्ते रुंद करण्याची मोहीत सुरू केली आहे. यात ज्या भागात रस्त्यांवर अतिक्रमण झाले आहेत, ते संबंधीतांनी स्वतःहून काढून घेण्याचे आवाहन गेल्या महिन्यातच जाहीर प्रगटनाद्वारे दिले होते. या आवाहनानंतर मागील तीन आठवड्यांपासून महापालिकेने शहरातील विविध रस्त्यांवर धडक मोहीमेला सुरूवात केली आहे.
यात सर्वात मोठी कारवाई ही बीड बायपास रस्त्यावर केली. त्यानंतर दोन आठवड्यांनी मुकुंदवाडीमध्ये मोहीम राबवण्यात येणार होती. परंतु १९ जून रोजी मुकुंदवाडी चौकात खून झाल्याने दुसऱ्या दिवशी महापालिका व पोलिस पथकाने संयुक्तरीत्या मोहीम राबवून येथील हॉटेल्स, दुकाने आणि घरे अशी एकूण २२९ अतिक्रमणे जमीनदोस्त केली.
या मोहिमेनंतर अनेकांनी न्यायालयात धाव घेत कारवाईला स्थगिती मिळवण्याचा प्रयत्न केला. परंतु, खंडपीठाने स्थगितीला नकार देत सर्व अतिक्रमण काढण्याचे आदेश दिले. विशेष म्हणजे सेव्हनहिलपासून ते केंब्रीजपर्यंत जालना रोडची रुंदी ६० मीटर आहे. मात्र असे असतानाही अतिक्रमण काढण्याची मोहीम मुकुंदवाडी ते केंब्रीजदरम्यानच केली जात आहे. त्यामुळे महापालिकेची कारवाई ही सामान्यांवर होत असून, बड्यांना अभय देत सपशेल कारवाईतून बाजूला ठेवले जात आहे. तेव्हा महापालिकेचे अधिकारी त्यांच्याशी चर्चा करून तोडगा काढण्याच्या तयारीत तर नाही ना, असा सवालही कारवाईतील बाधितांकडून उपस्थित होत आहे.
न्यायालयाने नागरिकांना स्वतःहून अतिक्रमण काढण्यासाठी बुधवारपर्यंत (दि. २५) वेळ दिला होता. त्यामुळे महापालिकेने गुरुवारपासून या ठिकाणी धडक मोहीम राबविण्याची तयारी केली होती. परंतु बुधवारी काही मालमत्ताधारक पुन्हा न्यायालयात गेले. त्यांनी आणखी दोन दिवस मुदत वाढून देण्याची मागणी केली. त्यास न्यायालयाने मंजुरी देत शुक्रवारपर्यंत (दि. २७) स्वतःहून अतिक्रमण काढण्यासाठी नागरिकांना वेळ दिल्याने महापालिका शनिवारपासून पाडापाडी सुरू करेल, असे अतिक्रमण विभागाचे अतिरिक्त आयुक्त संतोष वाहुळे यांनी सांगितले.
शहराची लाईफलाईन असलेला जालना रोड हा महावीर चौक (बाबा पेट्रोल पंप) ते सेव्हनहिलदरम्यान ४५ मीटर रुंदीचा तर सेव्हनहिल ते चिकलठाणा ६० मीटर रुंदीचा होता. परंतु, नव्या विकास आराखड्यात तो आता महावीर चौकापासून ते केंब्रीज शाळेपर्यंत ६० मीटर रुंदीचा झाला आहे, असे महापालिका अतिक्रमण हटाव विभागाचे अतिरिक्त आयुक्त संतोष वाहुळे यांनी सांगितले.
महापालिका मुकुंदवाडी ते केंब्रीज या ६० मीटर रस्त्याच्या रुंदीकरणाआड येणाऱ्या सर्व मालमत्ता काढत आहे. या मोहिमेविरोधात अनेकांनी खंडपीठात याचिका दाखल करून स्थगिती मिळवण्याचा प्रयत्न केला. मात्र, स्थगिती न देता न्यायालयाने शहरात जेथे जेथे रस्त्यावर अतिक्रमण आहे, रस्ते अडविले आहेत, ते मोकळे करण्याचे आदेश महापालिकेला दिले. असे असतानाही कारवाई मुकुंदवाडी ते केंब्रीजदरम्यानच केली जात आहे. जेव्हा की सेव्हनहिलपासून ते केंब्रीजपर्यंत रस्त्याची रुंदी ६० मीटर आहे.
जालना रोडवर मुकुंदवाडी ते केंब्रीजदरम्यान महापालिका सर्व्हिस रोडसाठी कारवाई करीत आहे. या कारवाईत न्यायालयाने दिलेल्या मुदतीत येथील सामान्य माणूस स्वतःहून अतिक्रमण काढून घेत आहे. तर दुसरीकडे मुकुंदवाडी ते सेव्हनहिल हाही मार्ग ६० मीटर रुंदीचा असतानाही येथील एकाही मालमत्ताधारकाने स्वतःहून अतिक्रमण काढणे सुरू केलेले नाही.
महापालिका बाबा पंप म्हणतेच महावीर चौक ते केंब्रीज शाळेपर्यंत सर्व्हिस रोड करण्याच्या तयारीत आहे. त्यासाठी हा संपूर्ण रोड ६० मीटर रुंद केला जाणार आहे. त्यामुळे या रस्त्यावर बांधकाम करणाऱ्यांना महापालिकेने ६० मीटर रुंदीच्या रस्त्याचा विचार करूनच बांधकाम परवानगी दिल्याचे प्रशासनाकडूनच सांगण्यात येत आहे.
जालना रोडवर ६० मीटरमध्ये जर कोणाकडे मालकी हक्काची कागदपत्रे असेल अन् त्याने रीतसर बांधकाम परवानगी घेऊन बांधकाम केले. तर महापालिका त्या मालमत्ताधारकाकडून नियमानुसार जागेचे भूसंपादन करेल. परंतु जागा स्वतःची असूनही विनापरवानगी बांधकाम केले असेल तर महापालिकेकडून ते बांधकाम पाडण्याची कारवाई केली जाईल. याशिवाय ६० मीटरसोडून कोणी विनापरवानगी बांधकाम केले असेल तर तेही बांधकाम पाडले जाईल, असेही अतिक्रमण विभाग प्रमुख संतोष वाहुळे यांनी सांगितले.