

Robbery suspect, absconding for two years, arrested
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : बुलढाणा जिल्ह्यातील गाजलेल्या किनगाव राजा दरोड्याप्रकरणातील दोन वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला अखेर मुकुंदवाडी पोलिसांनी अटक केली. अजय ऊर्फ भज्या मुरलीधर आदमाने याला ताब्यात घेऊन पुढील तपासासाठी बुलढाणा स्थानिक गुन्हे शाखेकडे सुपूर्द करण्यात आले.
ककिनगाव राजा पोलिस स्टेशन हद्दीत २०२३ मध्ये घडलेल्या धाडसी दरोड्यात आरोपींनी पीडितांच्या डोळ्यात मिरची पावडर फेकून सुमारे ४ लाख ५० हजार रुपयांची रोकड पळवली होती. या घटनेनंतर आरोपी फरार झाला होता.
दरोड्यातील एक आरोपी अजय ऊर्फ भज्या आदमाने हा छत्रपती संभाजीनगरातील मुकुंदवाडी परिसरातील राजनगर येथे वास्तव्यास असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे मुकुंदवाडी पोलिस ठाण्याचे सहायक फौजदार बाबासाहेब कांबळे, नरसिंग पवार, हवालदार गणेश वैराळकर व अंमलदार अनिल थोरे यांच्या पथकाने भज्याला शिताफीने ताब्यात घेतले.
अटक करण्यात आलेला आरोपी हा सराईत गुन्हेगार असून, त्याच्यावर विविध पोलिस ठाण्यांत गुन्हे दाखल आहेत. संबंधित गुन्ह्यात तो दोन वर्षांपासून पसार होता. या अटकेमुळे दरोड्याच्या तपासाला गती मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे.