

Rickshaw Drivers Stage 'Chakka Jam' Protest Against Gas Price Hikes and Shortages
वाळूज महानगर, पुढारी वृत्तसेवा :
एलपीजी गॅस दरात ३० ते ४० रुपयांनी वाढ होऊनही तो सहजासहजी मिळत नाही. गॅस दरवाढ कमी करावी, रिक्षा भाडे वाढ आदी मागण्यांसाठी सोमवारी (दि.३०) वाळूज महानगरात रिक्षाचालकांनी दिवसभर रिक्षा बंद ठेवून चक्का जाम आंदोलन केले. यामुळे प्रवाशांसह कामगारांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागला. सकाळी कामगारांना कंपनीत सोडून शहराकडे निघालेल्या एका खाजगी बसवर पंढरपूर येथे दगडफेक करण्यात आली.
शहरातून प्रवाशांसह हजारो कामगार वाळूज महानगर तसेच औद्योगिक क्षेत्रात अपे रिक्षामधून ये-जा करत असतात. आखाती देशांतील युद्धाचा परिणाम इंधन वाहतुकीवर झाल्याने एलपीजी गॅस पंपावर इंधनाचा तुटवडा निर्माण झाला आहे. शिवाय गेल्या महिनाभरात एलपीजी गॅस दरात ३० ते ४० रुपयांनी वाढ झाली आहे. गॅसची दरवाढ कमी करण्यात यावी, पंपासाठी नियमित एलपीजी गॅस पुरवठा करावा, रिक्षाचे भाडे वाढविण्यात यावे आदी मागण्यांसाठी सोमवारी (दि.३०) वाळूज महानगरात रिक्षाचालकांनी चक्का जाम आंदोलन करून दिवसभर रिक्षा बंद ठेवल्या होत्या. यामुळे पंढरपूर येथील तिरंगा चौक, कामगार चौक, सिटी बसच्या प्रतीक्षेत असलेले प्रवासी. (इन्सेट) अज्ञातांनी केलेल्या दगडफेकीत कंपनीच्या खाजगी बसचे झालेले नुकसान.
बजाजनगरातील मोरे चौक, महाराणा प्रताप चौक, कोलगेट चौक तसेच रांजणगाव फाटा आदी ठिकाणी प्रवाशांची मोठी गर्दी दिसून आली. शहरातून रांजणगाव, जोगेश्वरी, घाणेगाव, आंबेलोहळ, वाळूज आदी ठिकाणी जवळपास ३४ सिटी बस धावतात. परिसरात आज रिक्षा बंद असल्याने या मार्गावर सिटी बसची संख्या वाढविण्यात आली होती. मात्र प्रवासी तसेच कामगारवर्गाच्या तुलनेत ही संख्या कमी पडल्याने बसमध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी भरून नेण्यात येत होते. तर बसमधील गर्दी पाहून अनेक जण रिकामी बस कधी येईल याची प्रतीक्षा करताना दिसून आले.
कंपनीच्या खाजगी बसवर दगडफेक
सकाळी कंपनीत कामगारांना सोडून शहराकडे वापस निघालेल्या एका कंपनीच्या बस (एमएच २०, जीसी-८८७६) मध्ये चालकाने काही प्रवाशांना बसविले होते. पंढरपूर येथील तिरंगा चौकाजवळ सकाळी पावणेनऊ वाजेच्या सुमारास काही अज्ञातांनी या बसवर दगडफेक करून बसच्या डाव्या बाजूकडील तीन खिडक्यांच्या काचा तसेच्य साईड ग्लास फोडून बसचे नुकसान केले.
इंधन मिळेना
वाळूज महानगरात रिक्षांना स्टँडची सुविधा नाही. रिक्षा रस्त्यावर उभी राहिली तर पोलिस फोटो काढून ई-चलानद्वारे कारवाई करतात. दंडही वाढविण्यात आला आहे. यामुळे आता रिक्षा चालवणे कठीण झाले आहे. वाळूज औद्योगिक क्षेत्रातून अनेक खाजगी बसमधून कामगारांची ने-आण केली जाते. कामगारांना सोडल्यानंतर शहराकडे जाताना बसचालक अवैधरीत्या प्रवासी वाहतूक करतात. वाहतूक पोलिस अशा वाहनांना टाळून अपे रिक्षा चालकांना ते बळीचा बकरा बनवतात. त्यात गेल्या महिनाभरात इंधन दरात मोठी वाढ होऊनही इंधन टंचाईचा सामना करावा लागत असल्याचे रिक्षा चालक युनियन पदाधिकाऱ्यांनी सांगितले.