

Response to the Khatu Shyam rail journey
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा: खाटू श्यामजींच्या दर्शनासह श्रीमद् भागवत कथेची अनुभूती घेण्यासाठी सद्भावना सेवा समितीच्या वतीने ३० ऑगस्ट ते ५ सप्टेंबरदरम्यान आयोजित खाटू श्याम रेल्वे यात्रेला भक्तांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. यात्रेतील तब्बल ६१ टक्के सहभागी महिला व ज्येष्ठ नागरिक आहेत. सुरक्षित रेल्वे प्रवासासह निवास, भोजन आणि धार्मिक कार्यक्रमांची व्यवस्था समितीने केली आहे. प्रत्येक भक्ताला आनंददायी व संस्मरणीय अनुभव मिळावा यासाठी समिती प्रयत्नशील आहे, असे अध्यक्ष राधेश्याम चांडक यांनी सांगितले.
खाटू श्यामजींच्या पावन भूमीत पाच दिवस श्रीमद् भागवत कथेचे आयोजन करण्यात आले आहे. मंदिराच्या धर्तीवर कथामंडपाची सजावट करण्यात आली आहे. भक्तांची वाढती संख्या लक्षात घेऊन मंदिर परिसरातील तीन ठिकाणी निवासाची व्यवस्था करण्यात आली आहे. ३१ ऑगस्टला तीज व चतुर्थीनिमित्त विशेष पूजन, फराळ तसेच बाल संत दीपशरणजी महाराज यांच्या उपस्थितीत मंगल कलश यात्रा काढण्यात येणार आहे.
रायथल येथील गायक व वाद्यवृंदाच्या सहभागातून सुंदरकांडाचे आयोजन करण्यात आले आहे. ४ सप्टेंबरला सालासर बालाजीचे दर्शन घडविण्यात येणार आहे. यात्रेच्या यशस्वी आयोजनासाठी चंपालाल शर्मा, राजेश देशलहरा, प्रा. प्रकाशचंद्र पाठक, तिलोकचंद चांडक, सुरेशचंद्र गट्टाणी, सिद्धार्थ शर्मा, उमेश मुंदडा, विजय व्यवहारे, सुभाष दर्डा, मधुकर गायकी, पुरणमल शर्मा, बबन परांजपे, लाला माधवाणी, मनमोहन शर्मा व रामनिवास यादव परिश्रम घेत आहेत.
अध्यक्ष राधेश्याम चांडक हे व्यवस्थेवर जातीने लक्ष ठेवून आहेत, अशी माहिती सचिव प्रा. प्रकाशचंद्र पाठक यांनी दिली. सुमारे तीन हजार किलोमीटरचा रेल्वे प्रवास प्रतिकिलोमीटर पाच रुपयांपेक्षाही कमी खर्चात आयोजित करण्यात आला आहे. यात्रेची आठवण कायम राहावी यासाठी प्रत्येक भक्ताला भेटवस्तूही देण्यात येणार आहे.