

Recruitment soon in District Bank: Chairman Gade
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील लिपिक श्रेणीतील ९४ पदे भरती करण्यास शासनाने मंजुरी दिलेली आहे. या पदांसाठी भरती प्रक्रिया लवकरच राबविण्यात येणार असल्याची घोषणा बँकेचे अध्यक्ष अर्जुनराव गाडे यांनी केली. यासह आणखी २८६ पदांचा प्रस्ताव दाखल केलेला असल्याचे त्यांनी नमूद केले.
मराठवाड्यातील अग्रणी व शेतकऱ्यांची बँक अशी ओळख असलेल्या बँकेच्या संचालक मंडळाची बैठक शुक्रवारी (दि.३१) संपन्न झाली. त्या बैठकीत सहकार आयुक्त कार्यालयाने बँकेतील लिपिक श्रेणीतील ९४ पदे भरती करण्यास शासनाने मंजुरी दिलेली आहे. याबाबत लवकरच भरती प्रक्रिया सुरू करण्यात येईल. तसेच भविष्यात रिक्त होणाऱ्या पदांच्या अनुषंगाने बँकेने सहकार आयुक्त कार्यालयाकडे २८६ पदांचा प्रस्ताव दाखल केलेला आहे.
या प्रस्तावास सहकार आयुक्त कार्यालयाची मंजुरी प्राप्त होताच. त्यानुसार भरती प्रक्रिया शासनाच्या नियमांनुसार राबविण्यात येईल, असेही अध्यक्ष गाडे यांनी सांगितले. आमदार अब्दुल सत्तार यांच्या मार्गदर्शनाखाली बैठकीस जिल्हा बँकेचे अध्यक्ष गाढे, उपाध्यक्ष किरण पाटील डोणगावकर यांच्यासह सर्व संचालक मंडळ व बँकेचे सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
बेरोजगारांना नोकरीची संधी
जिल्हा बँकेचे मुख्य कार्यालय व जिल्ह्यातील एकूण १३७ शाखा आहेत. बँकेच्या अनुकंपाधारक एकूण पात्र ५२ वारसांना स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून नियुक्ती देण्यात आली. आता ९४ पदांची भरती प्रक्रिया सुरू होणार आहे. यासह २८६ पदांचा प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत असल्याने सुशिक्षित बेरोजगारांना बँकेत नोकरीची संधी आहे.