

Diwali is over, now preparations are underway for Tulsi Vivah
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : दिवाळी सण संपताच तुळशी विवाहची तयारी केली जाते. तुळशी विवाह हा प्रामुख्याने चातुर्मास आरंभिरी म्हणजेच आषाढ शुक्ल एकादशीला तुळशी रोपण करतात. कार्तिक शुद्ध एकादशीनंतर त्या तुळशीचा विवाह लावला जातो. तुळशी विवाह हा वार्षिक उत्सव म्हणून साजरा करतात. दरवर्षी प्रमाणे ही परंपरा यंदाही कायम ठेवली जाणार आहे. यंदा रविवारपासून तुळशी विवाहचा पर्वकाळ असणार आहे.
तुळस ही कृष्णध्वज राजाची कन्या आहे. तिच्या अनुपम सौंदर्यामुळे तिला तुळशी हे नाव पडले. तुळशीचे महत्त्व आणि माहात्म्य अनन्यसाधारण आहे. देवपूजा, श्राद्ध यासाठी तुळस अवश्य लागते. भगवान श्रीविष्णूस तुळस अत्यंत प्रिय आहे म्हणून तुळशीला हरिप्रिया म्हणतात. पूजेच्या साहित्यात तुळशीपत्र गरजेचे असते. त्याशिवाय देव प्रसाद ग्रहण करत नाहीत, असे मानले जाते.
नवमी, दशमीचे व्रत व पूजा करून नंतरच्या दिवशी तुळशीचे रोप ब्राह्मणाला दान करणे अत्यंत शुभ मानले जाते. स्नानानंतर रोज तुळशीच्या रोपाला पाणी देणे आरोग्यासाठी उत्तम मानले जाते. तुळशी विवाहची परंपरा दरवर्षी प्रमाणे यंदाही कायम असणार आहे. यावर्षीचा विवाह पर्वकाळ पाहता २, ३ आणि ४ नोव्हेंबर रोजी तुलसी विवाह पर्वकाळ असणार आहे. ५ नोव्हेंबर पौर्णिमेच्या दिवशी व्यतिपात योग असल्याकारणाने पौर्णिमेच्या दिवशी तुळशी विवाह करता येणार नाही.
अशी करा तयारी
कार्तिक शुद्ध द्वादशीपासून कार्तिक पौर्णिपर्यंत तुळशी विवाह करतात. मुख्यतः द्वादशीस तुलसी विवाह करण्याची प्रथा आहे. विवाहाची वेळ ही गोध-ळी (गाई चरून घरी येण्याची वेळ) म्हणजे सायंकाळची असते. तुळशी वृंदावन सारवून स्वच्छ करतात. वृंदावनास रंग लावून त्यावर स्वस्तिक काढतात.
राधा दामोदर प्रसन्न असे लिहितात. वृंदावनांतील तुळशींत चिंचा, आवळे ठेवतात. ऊस खोचून ठेवतात. उसाला वधूच्या मामाचा मान आहे. वृंदावनाभोवती मांडव घालावा. केळीचे गाभे, आंब्याच्या डहाळ्या, टाळे, फुलांच्या माळा लावाव्या. वृंदावनाभोवती सुंदर रांगोळी घालावी. पूजा साहित्य हळकुंडे, विड्याची पाने, सुपाऱ्या, खोबऱ्याच्या वाट्या, हळद - कुंकू, इत्यादी पूजा साहित्य, नारळ, पंचा, खण, नैवेद्यासाठी फराळाचे पदार्थ, निरनिराळी फळे, लाह्या, बत्तासे आदी साहित्य ठेवून तयारी करावी.