

Municipal Elections: Ward-wise voter lists in final stage
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : महापालिकेच्या अगामी सार्वत्रिक निवडणुका येत्या डिसेंबरअखेर जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यानुसार सध्या निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार मतदार याद्या अंतिम करण्याचे काम संपूर्ण २९ प्रभागांमध्ये सुरू असून या याद्यांमध्ये मर्जीतील मतदारांच्या नावांचा समावेश व्हावा, यासाठी इच्छुकांचे शर्तीचे प्रयत्न सुरू असल्याचे चित्र सध्या प्रभागनिहाय दिसत आहे.
राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा बिगुल आता केव्हाही वाजू शकतो. त्यामुळे प्रत्येक राजकीय पक्षांसोबतच प्रशासनही कामाला लागल आहे. शहरात महापालिकेने निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार तयार केलेल्या व आयोगाने मंजूर केलेल्या प्रभाग रचनेनंतर आता प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्या तयार करण्याचे काम सुरू आहे. शहरात पहिल्यांदाच प्रभाग पद्धतीने निवडणुका होत आहेत. त्यामुळे प्रत्येक इच्छुक हा सध्या निवडणुकीचे समीकरण जुळवण्यावर भर देत आहे. त्यासाठी मर्जीतील मतदार पाठीशी उभा असणे आवश्यक आहे.
दरम्यान, पाच वर्षांच्या प्रशासक राजनंतर सार्वत्रिक निवडणुका होत आहे. त्यामुळे यंदा महापालिकेच्या निवडणुकीत इच्छुकांची संख्या मोठ्याप्रमाणात असणार आहे. एका प्रभागामध्ये तब्बल ३५ ते ४३ हजारांहून अधिक मतदारांची संख्या आहे. त्यामुळे निवडून येण्यासाठी प्रत्येकांना किमान १० हजारांवर मतदान असणे आवश्यक आहे. या आकडेवारीनुसार सध्या प्रभागनिहाय मतदार याद्यांमध्ये मर्जीतील मतदारांचे नाव समाविष्ट करून घेण्यासाठी इच्छुकांचे शर्तीचे प्रयत्न सुरू आहे.
काही प्रभागांच्या याद्या तयार
महापालिकेचे २९ प्रभाग निश्चित करण्यात आले आहे. यातील बहुतांश प्रभागांच्या प्रारूप मतदार याद्या जवळपास पूर्ण झाल्या असून सध्या नकाशानिहाय अंतिम तपासणी सुरू आहे. येत्या बुधवारी या याद्या प्रसिद्ध केल्या जाणार आहेत. त्यानंतर यावर सूचना, हरकती नोंदविल्या जाणार आहेत. या याद्यांकडेच सध्या इच्छुकांचे लक्ष लागले आहे.