

Re-survey tender stalled by Code of Conduct
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीची आचारसंहिता लागू होताच महापालिकेच्या विकासकामांसह महत्त्वाच्या प्रशासकीय प्रक्रियांनाही ब्रेक लागला आहे. शहरातील मालमत्तांचे फेरसर्वेक्षण करून करआकारणीचे अद्ययावतीकरण करण्यासाठी सुरू असलेली सुमारे ४० कोटी रुपयांची निविदा प्रक्रिया आता महिनाभर लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.
दुसऱ्यांदा राबविण्यात आलेल्या निविदा प्रक्रियेत ऑर्नेट, पोर आणि स्थापत्य या तीन एजन्सींच्या निविदा प्राप्त झाल्या असून, त्यांचे टेक्निकल बीड उघडण्यात आले आहे. मात्र, आचारसंहितेमुळे टेक्निकल बीडची छाननी करून फायनान्स बीडसाठी पात्र-अपात्र ठरविण्याची पुढील प्रक्रिया रखडली आहे.
महापालिकेने शहरातील मालमत्तांचे पुनसर्वेक्षण करून मालमत्ता कराची आकारणी अधिक अचूक करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी पहिल्यांदा निविदा प्रक्रिया राबविण्यात आली होती. मात्र, अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने पुन्हा निविदा मागविण्यात आल्या. या दुसऱ्या निविदा प्रक्रियेत तीन एजन्सींनी सहभाग घेतला आहे.
त्यांच्या निविदांचे टेक्निकल बीड उघडण्यात आले असून, संबंधित कागदपत्रे आणि तांत्रिक निकषांची तपासणी केल्यानंतर फायनान्स बीडसाठी पात्र ठरणाऱ्या एजन्सी निश्चित केल्या जाणार होत्या. आता निवडणूक आचारसंहितेमुळे ही प्रक्रिया पुढे ढकलली गेली आहे. दरम्यान, आचारसंहितेचा फटका महापालिकेच्या नव्या विकासकामांनाही बसणार आहे. आधीच सुरू असलेल्या कामांवर थेट परिणाम होणार नसला, तरी नव्या कामांचे भूमिपूजन, लोकार्पण तसेच नवीन विकासकामांच्या निविदा प्रसिद्ध करण्यावर निर्बंध आहे.
राहणार आहेत. त्यामुळे निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत नव्या विकासकामांशी संबंधित निर्णय आणि प्रक्रिया रखडण्याची शक्यता आहे. तसेच आचारसंहितेमुळे महापालिकेच्या राजकीय कामकाजालाही ब्रेक लागला आहे. सर्वसाधारण सभा, स्थायी समिती तसेच विविध विषय समित्यांच्या बैठका घेता येणार नसल्याने मंजुरीच्या प्रतीक्षेत असलेल्या विषयांवर निर्णय होणार नाहीत. त्यामुळे प्रशासनाकडील नियमित कामकाज सुरू असले तरी पदाधिकारीस्तरावरील निर्णयप्रक्रिया ठप्प आहे.