

राहुल जांगडे
छत्रपती संभाजीनगर: गॅस टंचाईत होरपळणाऱ्या उद्योजकांना बीपीसीएल (भारत पेट्रोलियम) ने पाईपव्दारे गॅस पुरवठ्याची आशा दिली. त्यामुळे ५० पेक्षा अधिक उद्योजकांनी आवश्यक करार करून गॅसची मागणी केली. मात्र आठ दिवसांत अवघ्या ५ ते ६ उद्योगांनाच बीपीसीएलचे गॅस पाईप कनेक्शन मिळाले असून, प्रक्रियेतील विलंबामुळे पदरी निराशा पडल्याने इतर उद्योजक अक्षरशः मेटाकुटीला आले आहेत.
मध्यपूर्वेतील सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर एलएनजी पुरवठा विस्कळीत झाल्याने येथील उद्योगांना मोठा बसला आहे. गॅस टंचाईमुळे श्वास कोंडला गेलेल्या लहान-मोठ्या ४५ हून अधिक कंपन्यांवर उत्पादन बंद करण्याची नामुष्की ओढावली. इतरही बहुतांश उद्योग आपात्कालीन गॅस साठ्यावर सुरू आहेत. दरम्यान, अशा भंयकर परिस्थितीमुळे संकटात सापडलेल्या उद्योजकांना भारत पेट्रोलियमकडून पाईपव्दारे गॅस पुरवठ्याचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले.
करार केल्यानंतर लवकरच गॅस पुरवठ्याचा दावाही अधिकाऱ्यांनी केला. त्यामुळे मागील काही दिवसांत उद्योगनगरीतील सुमारे ५० उद्योजकांनी बीपीसीएलकडे गॅस कनेक्शनची मागणी केली. मात्र आतापर्यंत यापैकी मोजक्याच म्हणजे अवघ्या ५ ते ७ उद्योगांनाच गॅस पाईपचे कनेक्शन मिळाले आहेत. इतर उद्योजकांना मनुष्यबळाच्या अडचणीसह एक ना अनेक तांत्रिक कारणे सांगितली जात आहे. त्यामुळे उद्योजक बेजार झाले आहेत.
गॅस टंचाईमुळे उद्योग अडचणीत - एलपीजी गॅस टंचाईमुळे उद्योग अडचणीत सापडले आहेत. अशा वेळी बीपीसीएलने पाईपव्दारे गॅस पुरवठ्याची तयारी दर्शविली. त्यानुसार सुमारे ५० उद्य-ोजकांनी आवश्यक करार केला, परंतु आतापर्यंत अवघ्या ५ जणांनाच गॅस कनेक्शन मिळाले असून, इतर उद्योजकांना एक ना अनेक कारणे सांगितले जात आहे.
अर्जुन गायकवाड, अध्यक्ष, मसिआ
आणखी १५ दिवस लागणार पाईपव्दारे गॅस कनेक्शनची ५० पेक्षा जास्त उद्योजकांनी मागणी केली आहे. कनेक्शन देण्यापूर्वी संपूर्ण पाईपलाईन, प्रेशर तपासणी केली जाते. लिकेज तर नाही याची खबरदारी घ्यावी लागते. ही प्रक्रिया सुरू आहे. सर्वांना लवकरच कनेक्शन देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. यात आणखी १५ दिवस लागतील.
मनोज कुमार, टेरिटरी मॅनेजर, बीपीसीएल