

Radhika Merchant Ambani Paithan visit
पैठण : एके काळी कामगार आणि उद्योजकांमध्ये संघर्षाची ठिणगी पडल्यामुळे अनेक उद्योजकांनी पैठण एमआयडीसीकडे पाठ फिरवली होती. मात्र, अंबानी यांच्या सुनबाई राधिका मर्चंट अंबानी थेट हेलिकॉप्टरने पैठण येथे दाखल झाल्या. यावेळी त्यांच्यासोबत त्यांचे वडील होते.
औषधी उत्पादन क्षेत्रात कार्यरत इनकोर हेल्थ केअर कंपनीच्या विस्ताराला गती देत असून. या कंपनीच्या संचालिका राधिका मर्चंट-अंबानी यांनी गेल्या तीन महिन्यांत पाचव्यांदा पैठण एमआयडीसीला भेट दिली. मंगळवार व बुधवारी सकाळी सुमारे १०.३० वाजता त्यांनी कंपनी परिसराची पाहणी केली.
त्या हेलिकॉप्टरने संत एकनाथ सहकारी साखर कारखाना परिसरातील हेलिपॅडवर उतरल्या. यावेळी त्यांच्यासमवेत त्यांचे वडील उपस्थित होते. हेलिपॅडवरून त्या कंपनीच्या वाहनांच्या ताफ्यासह थेट कंपनीकडे रवाना झाल्या.
त्यांच्या आगमनाची माहिती मिळताच परिसरात महिला विद्यार्थी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर सपोनि ईश्वर जगदाळे यांनी पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात केला होता.
या दौऱ्यात कंपनीच्या विविध प्रकल्पांची प्रगती, उत्पादनाची गुणवत्ता, उपलब्ध सुविधा तसेच भविष्यातील विस्तार योजनांचा सविस्तर आढावा घेण्यात आल्याची माहिती कंपनी व्यवस्थापनाच्या सूत्रांनी दिली आहे.
दरम्यान या महिला उद्योजकांनी पैठण एमआयडीसी येथील आपल्या कंपनीचा विस्तार वाढवण्यासाठी स्वतः प्रयत्न केल्यामुळे या महिला उद्योजकाचे पैठणकर कौतुक करीत आहे.