

छत्रपती संभाजीनगर : कारचे टायर पंक्चर झाल्याचे सांगून एका कारचालकाने मदत केली. हवा भरत असतानाच मदत करणार्य़ा कारमधील लोकांनी थांबलेल्या कारमधून 2 लाख 62 हजारांची बॅग व इतर महत्त्वाची कागदपत्रे पळवली. ही घटना 4 मार्च रोजी रात्री 8 वाजेच्या सुमारास एमआयटी कॉलेज दरम्यान घडली.
सचिन भाउसाहेब बाकलीवाल (44, रा. गारखेडा परिसर) 4 मार्च रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास ते कंपनीतून कारने (एमएच-20 एफजी 7456) घरी निघाले होते. पैठण रोडवरील एका शोरूमसमोरून जात असताना एका कारमधील व्यक्तीने हॉर्न देत त्यांच्या वाहनाचे मागील डाव्या बाजूचे टायर पंक्चर असल्याचे सांगितले.
यानंतर बाकलीवाल यांनी कार रस्त्याच्या कडेला उभी करून डिक्कीमधून पंप काढून स्वत:च टायरमध्ये हवा भरण्यास सुरुवात केली. त्या वेळी कार अनलॉक होती. या संधीचा फायदा घेत मदत करणार्य़ा कारमधील तरुणांनी कारमधील बॅग ज्यात 2 लाख 62 हजार 480 रुपये रोख, तीन न वापरलेली चेकबुक, एका चेकबुकमधील काही चेक, कंपनीची महत्त्वाची कागदपत्रे तसेच पेन ड्राईव्ह असलेली बॅग पळवली.
दरम्यान हवा भरल्यानंतर बाकलीवाल यांनी एमआयटी कॉलेजसमोर पंक्चर काढून घेतले व घरी परतले. घरी पोहोचल्यानंतर कारमध्ये बॅग चोरीला गेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. या प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुद्ध सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.