

Pulses Price Hike: डाळीचे वरण आणि भात खाल्ल्याशिवाय अनेकांचे जेवण पूर्ण होत नाही. मात्र, तीन आठवड्याभरापासून डाळींना भाववाढीची फोडणी जास्त झाल्याने वरणाची चव बिघडली आहे. ठोक विक्रीत क्विंटलमागे ५०० ते १७०० रुपयांपर्यंत डाळी महागल्या आहेत.
खरीप हंगामातील तुरीच्या उत्पादनाला मोठा फटका बसला. त्यात बाजारातील तुरीची गुणवत्ता घसरलेली असल्याने चांगल्या तुरीला मागणी आहे.परिणामी, ऐन हंगामात तूरडाळीचे भाव वाढले. यंदा तुरीप्रमाणे मूग व उडदाचे उत्पादनही ३० ते ४० टक्के घटल्याने डाळीत वाढ झाली.
1) तूरडाळ ९३०० रु. ११००० रु.
2) मूगडाळ ९००० रु. ९८०० रु.
3) उडीद डाळ ८७०० रु. ११००० रु.
4) हरभरा डाळ ६५०० रु. ७००० रु.
5) मठ डाळ ७७०० रु. ८२०० रु.
6) मसूर डाळ ७५०० रु. ८०००
नवीन हरभऱ्याची आवक मार्चमध्ये होईल, पण ऑस्ट्रेलियात हरभऱ्याचे भाव कमी असल्याने तिथून आयात होत आहे. देशात मागणीच्या तुलनेत तुरीचे उत्पादन कमी असल्याने भाववाढ होत आहे. देशाची गरज पूर्ण करण्यासाठी टांझानिया, सुदान, म्यानमार, कॅनडा या देशातून तूर आयातीसाठी भारत सरकार बोलणी करीत असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली आहे.
मागील तीन आठवड्यांत उडीद डाळ व तूरडाळीत सर्वाधिक तेजी आली. क्विंटलमागे उडीद डाळ २३०० रुपयांनी तर तूरडाळ १७०० रुपयांनी महागली. मूग डाळ ८०० तर हरभरा डाळ व मठ डाळ ५०० रुपयांनी वाढली.