

नवी दिल्ली : आजच्या धकाधकीच्या जीवनात आपण आपले आरोग्य चांगले राहावे यासाठी आपल्या रोजच्या आहारात अनेक पोषकतत्त्व असलेल्या पदार्थांचे सेवन करत असतो. जसे की फळे आणि भाज्या तसेच डाळींचा समावेश असणे आवश्यक असते. पण त्याचबरोबर तुम्ही तुमच्या आहारात किंवा नाश्त्यात मोड आलेल्या कडधान्यांचा समावेश करू शकतात. अनेकांना नाश्त्यामध्ये स्प्राउट्स खाणे आवडते. कारण हे एक प्रथिनांचा एक चांगला स्रोत मानले जाते. तर यामध्ये फायबरदेखील चांगल्या प्रमाणात आढळते. जे पोट बराच काळ भरलेले ठेवण्यास मदत करते.
जे लोक जीमला जातात ते त्यांच्या आहारात प्रथिनांसाठी मोड आलेले मूग लाभदायक ठरतात. स्प्राउट्स केवळ प्रथिनांचाच चांगला स्रोत नाही, तर त्यात इतर अनेक पोषक घटकदेखील असतात, जे आपल्या एकूण आरोग्यासाठी फायदेशीर असतात. तुम्ही तुमच्या आहारात मोड आलेल्या कडधान्यांचा समावेश वेगवेगळ्या प्रकारे करू शकता. मोड आलेले कडधान्य हे एक प्रकारे ‘सुपरफूड’ आहे. मोड आलेल्या कडधान्यांमध्ये प्रथिने, फायबर आणि एन्झाईम्ससारख्या पोषक तत्त्वांचा भरपूर प्रमाणात समावेश असतो.
जे पचनासाठी फायदेशीर असतात आणि आतड्यांच्या आरोग्याला चालना देतात. मोड आलेल्या कडधान्यांमध्ये व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्सचे प्रमाण चांगले असते. त्याचवेळी व्हिटॅमिन के आणि त्यात असलेले कॅल्शियम आणि मॅग्नेशियमसारखे खनिजे हाडे निरोगी ठेवण्यास मदत करतात. तज्ज्ञांनी सांगितले की, मोड आलेल्या कडधान्यांमध्ये ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो, ज्यामुळे मधुमेहाचे रुग्णदेखील यांचे सेवन करू शकतात. कारण, ते रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास मदत करू शकते. हिरव्या कडधान्यांमध्ये असलेले क्लोरोफिल शरीराला डिटॉक्स करण्यास मदत करू शकते.
हिमोग्लोबिनचे प्रमाण सुधारते आणि शरीरात ऑक्सिजन योग्यरीत्या प्रवाहित होतो. मोड आलेल्या कडधान्यांमध्ये नियमितपणे खाल्ल्याने ऑक्सिडेटिव्ह ताण कमी होण्यास मदत होते. वृद्धत्व कमी करून त्वचा निरोगी ठेवण्यासदेखील मदत होते. तुमच्या रोजच्या डाएटमध्ये एक लहान वाटी मोड आलेल्या कडधान्यांचा समावेश करणे फायदेशीर ठरेल. तुम्ही हे हलके शिजवून किंवा सॅलडसोबत कच्चेदेखील खाऊ शकता. त्यात असलेले पोषक घटक शरीराला ऊर्जा देण्यासाठी, पचन सुधारण्यासाठी आणि एकूण आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकतात.