

property dealer turned drug supplier md drugs seized
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : प्रॉपर्टी व्यवहार पैसे कमी मिळत असल्याने प्रापर्टी डीलरने चक्क ड्रग्ज सप्लाय करण्यात गुंतला, अन् नारळीबागेत पोलिसांच्या सापळ्यात अडकला. विक्रीसाठी आणलेले ५१ ग्रॅम २९ मिलीग्रॅम एमडी (मेफेड्रोन), किंमत २ लाख ५३ हजार ८७० रुपये, अमली पदार्थ प्रतिबंधक पथकाने जप्त केले. नदीम इब्राहिम शेख (४०, रा. गणेश कॉलनी) याला अटक करण्यात आली असून, यात मुंबईच्या बांद्रा येथील एमडी पुरविणाऱ्या जाकेर झवेरीचा गुन्ह्यात सहभाग असल्याचे समोर आले आहे.
माहितीच्या आधारे पथकाने गुरुवारी (दि. १७) रात्री सापळा रचला. रात्री दहाच्या सुमारास नदीम शेख संशयास्पदरीत्या आढळून आला. त्याची झडती घेतली असता एमडीचा साठा सापडला. पोलिसांनी तत्काळ त्याला ताब्यात घेत अंमलीपदार्थ जप्त केला.
नदीम शेख हा प्रॉपर्टी डीलर असून पदवीपर्यंत शिक्षण झाले आहे. तो स्वतः एमडीचे सेवन करतो आणि त्याची विक्रीही करतो. गेल्या पाच-सहा महिन्यांपासून तो अंमली पदार्थांच्या विक्रीत उतरल्याचे त्याने सांगितले. हे ड्रग्ज मुंबईतील बांद्रा येथील जाकेर झवेरी याच्याकडून आणल्याचे पोलिसांना सांगितले.
अशी माहिती पोलिस उपनिरीक्षक उत्तरेश्वर मुंढे यांनी दिली. ही कारवाई सहायक पोलिस निरीक्षक सचिन जाधव, उपनिरीक्षक उत्तरेश्वर मुंढे, हवालदार भावसिंग चव्हाण, नारायण पायधन, सतीश जाधव, छाया लांडगे, देशराज मोरे, सरताज पठाण, विशाल मेटे, विठ्ठल पवार आदींनी केली.
नदीम शेखविरुद्ध सुमारे दीड-दोन वर्षापूर्वी सिटी चौक पोलिस ठाण्यात बनावट व्यक्ती उभी करून प्रॉपर्टी विक्री केल्याप्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे.