

President's Medal to three officers of the City Police Force
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा पोलिसांना गुणवत्तापूर्ण सेवा आणि शौर्यासाठी दिले जाणारे राष्ट्रपती पदक राज्यातील ३९ पोलिस अधिकारी कर्मचाऱ्यांना जाहीर झाले. यामध्ये शहर पोलिस दलातील तिघांचा समावेश आहे. स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला गुरुवारी (दि. १४) केंद्रीय गृह मंत्रालयाच्या वतीने उपसचिव डी. के. घोष यांनी नावाची यादी जाहीर केली. पोलिस आयुक्तालयातील विशेष शाखेचे उपनिरीक्षक दीपक परदेशी, आर्थिक गुन्हे शाखेतील सहायक उपनिरीक्षक प्रमोद पवार आणि नियंत्रण कक्षातील राजेंद्र मोरे यांना पदक जाहीर झाल्याबद्दल पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी तिघांचे अभिनंदन केले आहे.
उपनिरीक्षक दीपक परदेशी यांनी १९८९ मध्ये पोलिस दलात भरती झाले. ३५ वर्षे ९ महिन्यांच्या सेवेत त्यांना आतापर्यंत ३९७ रिवॉर्ड मिळाले. राजकीय पक्ष, संघटनांमधील अद्ययावत माहिती त्यांच्याकडे असते. विशेष शाखेत मोलाची कामगिरी बजावली आहे.
राजेंद्र मोरे १९९३ मध्ये पोलिस दलात भरती झाले. त्यांनी जवाहरनगर, क्रांती चौक पोलिस ठाणे, छावणी एसीपी, सीआयडी आणि उपायुक्त (मुख्यालय) कार्यालयात सेवा दिली आहे. त्यांना २९८ रिवॉर्ड मिळाले आहेत. २०१६ मध्ये त्यांना पोलिस महासंचालक सन्मानचिन्ह मिळाले आहे.
प्रमोद पवार यांनी १९९३ मध्ये पोलिस दलात रुजू झाले. क्रांती चौक ठाणे, ट्राफिक, गुन्हे शाखा, आर्थिक गुन्हे शाखेत त्यांनी कार्य केले. ३२ वर्षे ५ महिन्यांच्या सेवेत त्यांना २७७ रिवॉर्ड मिळाले आहेत. २०१९ मध्ये त्यांना पोलिस महासंचालक सन्मानचिन्ह देखील मिळाले आहे.