

गंगापूर :रुग्णांना वेळेत आणि दर्जेदार उपचार मिळालेच पाहिजेत. आरोग्यसेवेत निष्काळजीपणा अथवा दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही, असा स्पष्ट इशारा आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिला. शनिवारी (दि. २८) त्यांनी गंगापूर उपजिल्हा रुग्णालयाला भेट देऊन आरोग्य सुविधांची पाहणी केली. यावेळी रिक्त वैद्यकीय पदे, औषधांचा तुटवडा, डॉक्टर-कर्मचाऱ्यांची उपस्थिती आणि रुग्णसेवेतील त्रुटींचा आढावा घेतला.
आरोग्य संवाद यात्रेदरम्यान झालेल्या या पाहणीत रुग्ण कल्याण समितीचे सदस्य अतुल रासकर यांनी रुग्णालयातील समस्या आणि रुग्णांना भेडसावणाऱ्या अडचणी मांडल्या. यावर आरोग्यमंत्र्यांनी नाराजी व्यक्त करत अधिकाऱ्यांकडून स्पष्टीकरण मागितले. आमदार प्रशांत बंब यांनीही रुग्णालयाच्या प्रशासकीय कामकाजाबाबत नाराजी व्यक्त केली.
अधिकारी-कर्मचाऱ्यांची उपस्थिती तपासण्यासाठी ड्युटी रजिस्टरची पाहणी करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. वैद्यकीय अधीक्षक डॉ. अभिजित खंदारे यांच्या कामकाजासंदर्भातील चौकशी अहवालही आरोग्यमंत्र्यांकडे सादर करण्यात आला.
यावेळी आमदार प्रशांत बंब, जिल्हा परिषद अध्यक्ष अविनाश गलांडे, माजी आमदार अण्णासाहेब माने, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कमलाकर मुदखेडकर, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. पद्मजा सराफ, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभय धानोरकर यांच्यासह आरोग्य विभागाचे अधिकारी, डॉक्टर, उपस्थित होते. पाहणीदरम्यान डॉक्टरांची अनियमित उपस्थिती, औषधे व जीवनरक्षक औषधांचा अपुरा साठा, बंद वैद्यकीय उपकरणे, पिण्याच्या पाण्याच्या समस्यांवर चर्चा झाली.
रुग्णवाहिका सेवा आणि शासकीय आरोग्य योजनांच्या अंमलबजावणीतील त्रुटीही निदर्शनास आणून देण्यात आल्या. सर्व आरोग्य संस्थांमध्ये २४ तास अत्यावश्यक सेवा उपलब्ध ठेवाव्यात. अशा सूचना आरोग्यमंत्र्यांनी दिल्यात.
रिक्त पदे भरण्याबाबत चर्चा
रुग्णालयातील रिक्त वैद्यकीय पदे, तज्ज्ञ डॉक्टरांची कमतरता आणि आवश्यक मनुष्यबळाचा प्रश्न यावरही चर्चा झाली. यावेळी आरोग्यमंत्र्यांनी रुग्ण, नातेवाईक, डॉक्टर व कर्मचाऱ्यांशी संवाद साधून अडचणी जाणून घेतल्या. आरोग्यसेवेत हलगर्जीपणा आढळल्यास संबंधितांवर कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.