

Potholes on the side strips of the highway are dangerous
वाळूज, पुढारी वृत्तसेवा : छत्रपती संभाजीनगर-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील कामगार चौक ते इसारवाडी फाट्यापर्यंत दुतर्फा असलेल्या साईड पट्ट्यांवर मोठमोठे खड्डे पडले आहेत. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे या खड्यांमध्ये पाणी साचत असल्याने त्यांचा अंदाज वाहनचालकांना येत नाही. खड्डे चुकविताना दुचाकीस्वारांचे संतुलन बिघडणे तसेच वाहनांचे अपघात होण्याचा धोका वाढला आहे. त्यामुळे नागरिक व वाहनधारकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
वाळूज एमआयडीसी परिसरात हजारो कामगार व कर्मचाऱ्यांसह मालवाहू ट्रक, कंटेनर, बस आणि दुचाकींची मोठी वर्दळ असते. गरवारे कंपनी, मटेरियल गेट, लायननगर फाटा, लिबेंजळगाव परिसर ते इसारवाडी फाटा या मार्गावर विविध ठिकाणी खड्डे पडल्याने वाहतूक धोकादायक बनली आहे.
काही ठिकाणी खड्डे अत्यंत खोल झाले असून, त्यात पावसाचे पाणी साचल्याने त्यांची खोली व आकार समजत नाही. वाहन खड्ड्यात आदळल्यानंतर अचानक वेग कमी होत असल्याने पाठीमागून येणाऱ्या वाहनांची धडक होण्याचा धोका निर्माण झाला आहे. दुचाकीस्वारांना याचा सर्वाधिक फटका बसत असून, रात्रीच्या वेळी अपुरा प्रकाश असल्याने धोका आणखी वाढतो. आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर काही ठिकाणी खड्ड्यांची तात्पुरती डागडुजी करण्यात आली होती.
मात्र, पावसाचे पाणी आणि वाहनांची सततची वर्दळ यामुळे ही डागडुजी काही दिवसांतच उखडली. त्यामुळे खड्ड्यांचा प्रश्न पुन्हा गंभीर झाला असून, कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी वाहनधारकांकडून होत आहे.
उद्योगांवरही परिणाम
वाळूज एमआयडीसीमध्ये देश-विदेशातील व्यावसायिकांची ये-जा असते. मात्र, महामार्गाची दुरवस्था पाहता उद्योगनगरीची नकारात्मक प्रतिमा निर्माण होत असल्याचे उद्योजकांचे म्हणणे आहे. खराब रस्त्यांमुळे मालवाहतुकीस विलंब होत असून, वाहनांच्या देखभाल व दुरुस्तीचा खर्चही वाढत आहे. खड्यांमुळे वाहने नादुरुस्त झाल्यास अतिरिक्त आर्थिक भार वाहनमालकांना सहन करावा लागत आहे. महामार्गावरील खड्ड्यांमुळे यापूर्वीही अपघात झाले असून, काहींना जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभाग आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने तातडीने पाहणी करून धोकादायक खड्डे बुजवावेत. तसेच आवश्यक ठिकाणी सूचना फलक व पुरेशी प्रकाश व्यवस्था करावी, अशी मागणी नागरिक व वाहनधारकांकडून होत आहे.