

Police take action against noise riders
सिल्लोड, पुढारी वृत्तसेवा : शहरात ध्वनिप्रदूषण माजवणाऱ्या कर्णकर्कश हॉर्न व मॉडिफाइड सायलेन्सरधारी दुचाकींवर सिल्लोड शहर पोलिसांनी थेट वज्रदंड उगारत बेशिस्त रायडर्सची दहशत मोडीत काढली आहे.
शहरात राबविण्यात येत असलेल्या विशेष मोहिमेत रॉयल एनफिल्ड बुलेटसह एकूण ९ दुचाकींवर पोलिसांनी कारवाई करत १८ हजार रुपयांचा दंड ठोठावला. मॉडिफाइड सायलेन्सर व कर्णकर्कश हॉर्न असलेल्या दुचाकी जप्त करण्यात आल्या. कारवाईनंतर अनेक रायडर्सनी भीतीपोटी वाहने रस्त्यावर काढणे टाळल्याचे चित्र दिसून आले.
जप्त दुचाकींवरील कर्णकर्कश हॉर्न व सायलेन्सर तत्काळ काढून कायमस्वरूपी डिस्ट्रॉय करण्यात आले. यामुळे एकदा पकडले गेले की कायमचा धडा असा संदेश पोलिसांनी दिला आहे.
मुख्य रस्ते, बसस्थानक परिसर, बिलालनगर बस स्टैंड रोड, टिळक नगर, शास्त्री कॉलनी व शिक्षक कॉलनी येथे वाढलेल्या आवाजामुळे नागरिक त्रस्त झाले होते. विशेषतः रुग्णालय परिसरात तक्रारी वाढल्याने पोलिसांनी ही धडक कारवाई केली.
ही मोहीम पोलिस निरीक्षक शेषराव उदार यांच्या मार्गदर्शनाखाली, वाहतूक सपोनी केदारनाथ पालवे यांच्या नियंत्रणात पोहेकॉ नरेंद्र खंदारे, शेख अझरुद्दीन, राजू संपाळ यांच्यासह वाहतूक पोलिसांनी पार पाडली. पोलिसांनी स्पष्ट इशारा दिला असून, यापुढेही अशा वाहनांवर जप्ती व दंड अटळ राहील.