

A leopard has been spotted in the Takli area
ढोरकीन, पुढारी वृत्तसेवा
पैठण तालुक्यातील टाकळी परिसरात बिबट्याचा वावर वाढल्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. टाकळी शिवारात रात्री रब्बी हंगामातील पिकांना पाणी देण्यासाठी गेलेल्या काही शेतकरी तरुणांना शेतात बिबट्या दिसल्याचा दावा केला जात आहे.
ते दोन-तीन जणं असल्यामुळे त्यांनी त्या बिबट्याचे व्हिडिओ चित्रण करण्याचे धाडस केले. बिबट्याला पकडण्यासाठी आता पिंजरा लावण्याची मागणी होत आहे. टाकळी येथील योगेश मोहिते हा तरुण शेतकरी व सोबत अन्य तिघेजण बुधवारी (दि.२१) रात्री शेतात पिकाला पाणी देण्यासाठी गेले होते.
बाजरीच्या पिकाला पाणी भरत असताना रात्री सुमारे दोन वाजेच्या सुमारास बिबट्या दिसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. योगेशने बिन्नी गवतात बिबट्या बसलेल्या अवस्थेत व्हिडिओ आपल्या मोबाईलमध्ये चित्रित केल्याचे त्याचे म्हणणे आहे. वनविभागाने सदर विवट्याचा बंदोबस्त करावा, अशी शेतकऱ्यांनी मागणी करूनही त्याकडे दुर्लक्ष केल्याने नागरिकांत संताप व्यक्त केला जात आहे. मागील अनेक दिवसांपासून बिबट्याचा टाकळी परिसरात वावर असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
दिवसा वीजपुरवठ्याची मागणी
येथील बहुतांश शेतकरी शेतात रात्री अपरात्री पिकांना पाणी देण्यासाठी जातात. पिंजरे लावून बिबट्याला पकडावे तसेच वीजवितरण कंपनीने जोपर्यंत बिबट्या पकडला जात नाही तोपर्यंत परिसरात दिवसा वीज देण्याचे नियोजन करावे, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांकडून केली जात आहे.