

वाळूज महानगर : सोशल मीडियावर सध्या प्रचंड चर्चेत असलेल्या कॉक्रोच जनता पार्टी (सीजेपी) संस्थापक अभिजित दिपके यांचे आई-वडील राहात असलेल्या सिडको वाळूज महानगरातील बंगल्यासमोर शनिवार (दि. २३) पासून पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
सुरक्षेच्या दृष्टिकोनातून या बंगल्यासमोरील चौकात सीसीटीव्ही कॅमेरेही बसविण्यात आले असून, पोलिस उपायुक्त पंकज अतुलकर यांनी स्वतः या ठिकाणी भेट देऊन बंदोबस्ताचा आढावा घेतला. सिडको वाळूज महानगर-१ मधील जिजामाता चौकात अभिजित दिपके यांचा बंगला आहे. अभिजित सध्या अमेरिकेत असून, त्यांचे आई-वडील या बंगल्यात वास्तव्यास असतात.
मात्र, नातेवाईकाच्या लग्नाला चाललो आहोत असे त्यांच्या भाडेकरूला सांगून दिपके दाम्पत्य दोन दिवसांपूर्वीच बंगल्याला कुलूप लावून बाहेरगावी गेले आहेत. वरिष्ठांच्या आदेशानुसार या कुलूपबंद बंगल्यासमोर सुरक्षेची खबरदारी म्हणून दोन पोलिस अधिकारी आणि २२ पोलिस अंमलदार तैनात करण्यात आले आहेत. यासोबतच दिपके यांच्या बंगल्यासमोरील चौकात नव्याने सीसीटीव्ही कॅमेरेही बसविण्यात आल्याची माहिती पोलिस निरीक्षक रामेश्वर गाडे यांनी दिली आहे.