

police detain man brandishing sword
सिल्लोड, पुढारी वृत्तसेवा : तलवारीचा धाक दाखवून दहशत माजवणाऱ्या एकाला ग्रामीण पोलिसांनी पकडले. ही कारवाई गुरुवारी (दि. १७) तालुक्यातील बोरगाव बाजार येथे करण्यात आली. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेत तलवार जप्त केली. तर या कारवाईमुळे गावात एकच खळबळ उडाली होती.
सागर संतोष गोसावी (३३) रा. बोरगाव बाजार) असे ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याला पोलिसांनी एका कापड दुकानातून ताब्यात घेतले. एका तरुणाजवळ धारदार तलवार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
मिळालेल्या माहितीवरून गुरुवारी पोलिसांनी मोठ्या शिताफीने आरोपीला पकडले व त्याच्या ताब्यातील धारदार तलवार जप्त केली या प्रकरणी ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक राजेंद्र बनकर करीत आहे.
ही कारवाई सहायक पोलिस निरीक्षक रवींद्र ठाकरे, उपनिरीक्षक राजेंद्र बनकर, बीट जमादार अक्रम पठाण, विनोद सरोदे, राजेंद्र काकडे, पंडित फुले, विनोद नागलोद, निवृत्ती जाधव यांनी केले. दरम्यान आरोपीने तलवार कशासाठी व कोठून आणली ? याचा तपास पोलिस करीत आहे. तर ऐन गणपती उत्सवात पोलिसांनी माहिती काढत आरोपीला धारदार तलवारीसह ताब्यात घेतले-