

Action will be taken against those involved in sand smuggling from the Godavari river.
पैठण : पुढारी वृत्तसेवाः पैठण तालुक्यातील गोदावरी नदीतून अवैधरीत्या वाळू तस्करी करणाऱ्या दोन जणांविरुद्ध पैठण पोलिसांनी कारवाई करून १० लाख २५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला ही कारवाई शनिवारी पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास करण्यात आली. चालक अलाउद्दीन इब्राहीम पठाण, रा. सोनवाडी, ता. पैठण, भारत तात्यासाहेब खराद रा. सोलनापूर, ता. पैठण यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
पैठण तालुक्यातील गेल्या अनेक वर्षांपासून गोदावरी नदीतील वाळू उत्खनन करण्याचा कुठलाही लिलाव झालेला नसल्याचा संधीचा फायदा घेऊन व येथील गोदावरी नदीच्या वाळूला वाढती मागणी असल्याने स्थानिक महसूल विभागाच्या कर्मचाऱ्याला हाताशी धरून वाळू तस्करांनी मध्यरात्रीच्या दरम्यान गोदावरी नदीतून मोठ्या प्रमाणावर वाळू तस्करी करण्याचा सपाटा चालविलेला आहे.
या विषयीची माहिती पोलिस विभागाला प्राप्त झाल्याने शनिवार, दि ३ रोजी पहाटे ३.३० वाजेच्या दरम्यान सोलनापूर ते आपेगाव जाणाऱ्या ज्ञानेश्वरवाडी या रस्त्यावरून अवैधरीत्या वाळूची तस्करी वाहतूक करीत असलेला हायवा क्र. एम एच ४८ एजी ६२६७पैठण पोलिस निरीक्षक महादेव गोमारे यांच्या पथकातील पोलिस उपनिरीक्षक प्रमोद यादव, पोकों मुजस्सर पठाण, ढाकणे, खिळे यांना आढळून आला.
सदरील हायवा पोलिस ठाण्यात आणून अवैधरीत्या वाळू तस्करी करणाऱ्या चालक अलाउद्दीन इब्राहीम पठाण रा. सोनवाडी, ता. पैठण, भारत तात्यासाहेब खराद रा. सोलनापूर, ता. पैठण यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची कारवाई करून एक हायवा वाहन किंमत १० लाख रुपये, पाच ब्रास वाळू किंमत २५ हजार रुपये असा एकूण १० लाख २५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. तपास पोहेकॉ राजेश आटोळे हे करीत आहेत.