

Leopard terror in Gangapur taluka.
गंगापूर, पुढारी वृत्तसेवा गंगापूर तालुक्यातील गोदावरी नदीपट्टा व परिसरातील शेंदूरवादा, सावलेडा, दहेगाव बंगला, अगर कानडगाव, जामगाव, गहनिष, तांदूळवाडी, कोळघर, नेवरगाव, बावरगाव आदी गावांच्या शिवारात बिबट्यांचा मुक्त संचार वाढला असून शेतकरी व पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते गणेश राऊत यांनी माननीय जिल्हाधिकारी, छत्रपती संभाजीनगर यांना निवेदन देत तातडीने बिबट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे.
निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, संबंधित भागात सुमारे २० ते २५ बिबटे असल्याचा अंदाज असून गेल्या सहा महिन्यांत अनेक जनावरांवर हल्ले झाले आहेत. शेतवस्त्यांवरील नागरिक भयभीत झाले असून शेती कामांसाठी जाताना शेतकरी धास्तीखाली वावरत आहेत. वनविभागाकडून प्रभावी उपाययोजना होत नसल्याचा आरोपही निवेदनात करण्यात आला आहे.
दरम्यान, निवेदनात एक आगळी मागणीही करण्यात आली आहे. देश विदेशातील काही ठिकाणी हिंस्र प्राण्यांचे संगोपन केले जाते, असा संदर्भ देत बिबट्यांची पिल्ले नागरिकांना रीतसर परवानगीने पाळण्याचा पर्याय शासनाने अभ्यासावा, अशी विनंती करण्यात आली आहे. लहानपणापासून मानवी सहवासात आल्यास प्राणी माणसाळू होतात, असा दावा निवेदनात करण्यात आला आहे.
या प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी जातीने लक्ष घालून परिसरातील बिबट्यांची संख्या निश्चित करावी व तातडीने योग्य बंदोबस्त करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. दरम्यान, या मागणीवर प्रशासन व वनविभाग काय भूमिका घेते, याकडे शेतकरी व नागरिकांचे लक्ष लागले आहे.
सोयगावात शेतकऱ्यावर हल्ल्याचा प्रयत्न
सोयगाव तालुक्यातील रावेरी शिवारात बिबट्या दर्शनाने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. शुक्रवारी (दि.२) सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास शेतात गेलेल्या एका शेतकऱ्यावर बिबट्याने झडप घालण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली. सुदैवाने प्रसंगावधान राखत शेतकरी येथील गणेश दिनकर पाटील थोडक्यात बचावले.
घटनेची माहिती मिळताच गावातील १० ते १५ नागरिक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी फटाके फोडत आरडाओरड केल्याने बिबट्याने तेथून पळ काढला. या घटनेमुळे रावेरी व परिसरातील शेतकरी व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शेतात जाणे धोकादायक बनले असून नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे. दरम्यान, संबंधित वनविभाग व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने दखल घेऊन बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.