

Police Commissioner conducts an inspection following the incident of stone-pelting at a vehicle on the Samruddhi Expressway
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा समृद्धी महामार्गावर वाशीम जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या शासकीय वाहनावर झालेल्या दगडफेकीच्या घटनेची पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी गंभीर दखल घेतली. भविष्यात प्रवाशांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण होऊ नये आणि अशा अनुचित घटनांना आळा बसावा, यासाठी आयुक्तांनी शुक्रवारी (दि. २०) वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या ताफ्यासह सावंगीतील घटनास्थळी जाऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी महामार्गावर २४ तास 'डायल ११२' चे वाहन तैनात ठेवण्यासह रात्रगस्त अधिक कडक करण्याचे आदेश दिले.
वाशिम जिल्हा सामान्य रुग्णालयाचे अधीक्षक हिम्मत राठोड हे सहकाऱ्यांसह शासकीय वाहनाने पुण्याकडे बैठकीसाठी निघाले होते. सायंकाळी सावंगी परिसरात त्यांच्या वाहनावर दगडफेक झाल्याने समोरची काच फुटली होती. त्यानंतर त्यांच्या चालकाने समृद्धीच्या कंटोल रूमला कॉल करताच काही वेळात महामार्ग पोलिस मदतीसाठी तिथे पोहोचले.
त्यानंतर तासाभराने डायल ११२ ला कॉल केल्याने हर्सल पोलिसांनी त्यांच्याशी संपर्क साधला. तेव्हा पोलिस आल्याचे त्यांनी सांगितल्याने त्यांना हसूल ठाण्यात तक्रार देण्यास येण्याचे सांगण्यात आले होते. मात्र, ते बैठकीसाठी तसेच पुढे निघून गेल्याने गुन्हा दाखल झाला नाही. दरम्यान, शुक्रवारी पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी तात्काळ पावले उचलली.
शहर पोलिस हद्दीतील सावंगी, माळीवाडा आणि इतर भागांतून जाणाऱ्या समृद्धी महामार्गावर सायंकाळी ५ ते सकाळी ५ या वेळेत दोन शिफ्टमध्ये विशेष गस्ती वाहने तैनात करण्याच्या सूचना दिल्या. तसेच, आपत्कालीन मदतीसाठी 'डायल ११२' चे एक वाहन कायमस्वरूपी या मार्गावर गस्त घालेल, असेही त्यांनी आदेशित केले. यावेळी परिमंडळ-१ चे उपायुक्त पंकज अतुलकर, परिमंडळ-२ चे रत्नाकर नवले, गुन्हे शाखेचे शशिकांत सातव, शर्मिष्ठा वालावलकर यांच्यासह पोलिस निरीक्षक गजानन कल्याणकर, अतुल येरमे, स्वाती केदार आदी उपस्थित होते.
दगडफेकीची घटना ग्रामीण पोलिसांच्या हद्दीत पोलिसांच्या पाहणीत संबंधित घटना ही ग्रामीण पोलिसांच्या फुलंब्री ठाण्याच्या हद्दीत घडल्याचे स्पष्ट झाले. मात्र, घटना घडल्यावर राठोड यांचे वाहन ४ किमी पुढे जाऊन थांबले. त्यांनी त्याठिकाणाहून संपर्क केल्याने शहर पोलिसांच्या डायल ११२ कडे तो कॉल पडल्याचे स्पष्ट झाल्याचे सूत्रांनी सांगितले. तरीही पोलिस आयुक्तांनी हद्दीचा वाद न करता पुढील सुरक्षेसाठी यंत्रणा राबवण्याचे आदेश दिले.