

Pishor police action
पिशोर : कन्नड तालुक्यातील शेफेपूर-पिशोर गावातील हरी मस्जिद जवळ अवैधरित्या गोवंश (बैल) कत्तल करणाऱ्या दोघांवर पिशोर पोलिसांनी कारवाई करत ४६,३५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. सहायक पोलीस अधीक्षक श्रीमती अपराजिता अग्निहोत्री यांच्या सूचनेनुसार ही कारवाई करण्यात आली.
पोलिसांना मिळालेल्या खात्रीलायक गुप्त माहितीच्या आधारे आज (दि.९) पहाटे छापा टाकण्यात आला. सकाळी साडेपाचच्या सुमारास पिशोर पोलिसांना रिजवान नवाब सैय्यद (वय २७) व त्याचा भाऊ अबुजर नवाब सैय्यद (वय २४) हे आपल्या राहत्या घरात गोवंशाची अवैधरित्या कत्तल करून मांस विक्रीसाठी तयार ठेवत असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी तत्काळ खात्री करून पंच, आयबाईक अंमलदार, व पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सकाळी ८ वाजता छापा टाकला.
झडतीदरम्यान पोलिसांना १७३ किलो गोवंश मांस, कातडी, चार पाय, व इतर अवयवाचे अवशेष, धारदार कुऱ्हाडी, चाकू, वजन मापके, लोखंडी तराजू असे एकूण ४६,३५०रुपयांचे साहित्य आढळून आले. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत नमुने (C.A. सॅम्पल) घेतले असून, आरोपींविरुद्ध महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियमांतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक विनायकुमार राठोड, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती अन्नपूर्णा सिंह, सहाय्यक पोलीस अधीक्षक श्रीमती अपराजिता अग्निहोत्री यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजीराव नागवे, पोलीस उपनिरीक्षक विश्वजीत फरताडे, पोलीस हवालदार विलास सोनवणे, वसंत पाटील, दत्तू लोखंडे, विजय भोटकर, कौतिक सपकाळ, पवन खंबाट, रेणुका दाभाडे, आयबाईक अंमलदार संदीप जोनवाल, पशुवैद्यकीय अधिकारी यांचा सहभाग होता.
या छापा कारवाईचा पंचनामा पोलीस हवालदार वसंत पाटील यांनी पंचांच्या उपस्थितीत करून साक्षी व व्हिडिओग्राफीसह नोंदवला. प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजीराव नागवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विश्वजीत फरताडे करीत आहेत.