

Heavy rain relief: Rs 836 crore fund for Sambhajinagar, Jalna
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर विभागातील अतिवृष्टीग्रस्तांसाठी राज्य सरकारने बुधवारी आणखी एकूण ९१३ कोटी ४१ लाख रुपयांची मदत मंजूर केली. यात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासाठी ४८० कोटी आणि जालना जिल्ह्यासाठी ३५६ कोटी रुपये मिळाले आहेत. तर नागपूर विभागातील वर्धा जिल्ह्यासाठी ७६ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहे.
राज्यात यंदा पावसाने धुमाकूळ घातला. विशेषतः मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत शेती पिकांचे अतोनात नुकसान झाले. त्यामुळे राज्य सरकारने अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार टप्प्याटप्प्याने निधी मंजूर करण्यात येत आहे. याअधी मराठवाड्यासाठी सुमारे तीन हजार कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
असे असले तरी हा निधी प्रामुख्याने नांदेड, हिंगोली, परभणी, धाराशिव, लातूर, बीड जिल्ह्यांसाठी होता. छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्तांची मदत मात्र बाकी होती. अखेर बुधवारी राज्य सरकारने मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना तसेच नागपूर विभागातील वर्धा या तीन जिल्ह्यांसाठी एकूण ९१३ कोटींचा निधी मंजूर केला आहे. हा निधी एकूण १२ लाख ६२ हजार बाधित शेतकऱ्यांसाठी देण्यात आला आहे.
जिल्हानिहाय मंजूर मदत
छत्रपती संभाजीनगर : ४८० कोटी १७ लाख रुपये
जालना : ३५६ कोटी ६६ लाख रुपये
वर्धा : ७६ कोटी ५७ लाख रुपये