

छत्रपती संभाजीनगर : फुलंब्रीत मतदार संघात शिंदेसेनेकडून भाजपसह काँग्रेस, ठाकरेसेनेला दे धक्का देण्यात आला आहे. या तिन्ही पक्षांतील अनेक आजीमाजी पदाधिकाऱ्यांसह शेकडो कार्यकर्त्यांनी पक्षाला सोड चिड्डी देत शिंदेसेनेत प्रवेश केला. मुंबईत खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा मंगळवारी (दि. १) पार पडला.
यावेळी पालकमंत्री संजय शिरसाठ, खासदार संदीपान भुमरे, आमदार अब्दुल सत्तार, आमदार विलास भुमरे, जिल्हाप्रमुख रमेश पवार, जिल्हा परिषद गटनेते राधाकिसन पठाडे, तालुकाप्रमुख मनोज शेजूळ आणि चंद्रकांत जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती. फुलंब्री मतदार संघात सध्या शिवसेना शिंदे गटाने भाजपसह सर्वच पक्षांना खिंडार पाडण्याची तयारी सुरू केली आहे. आतापासून विधानसभा मतदार संघात पक्षाने ताकद निर्माण करण्यास सुरुवात केली आहे.
यात प्रामुख्याने जिल्हा परिषदेतील शिंदेसेनेचे गटनेते राधाकिसन पठाडे यांनी कंबर कसली आहे. जिल्हा परिषद निवडणूकीत भाजपने त्यांना उमेदवारी नाकारली होती. त्यामुळे पठाडे यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश करुन निवडणूक लढवित ते विजयी देखील झाले. आता त्यांनी मतदार संघात पक्षाची ताकद वाढविण्यास सुरुवात केली आहे. त्याचा एक भाग म्हणजे मुंबईतील प्रवेश सोहळा आहे.
या पक्ष प्रवेश सोहळ्यात भाजपसह काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना (उबाठा) गटातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या प्रवेश करण्यात आला. १ सप्टेंबरला हा प्रवेश सोहळा मुंबईत शिवसेना नेते खासदार श्रीकांत शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. यात फुलंब्रीचे नगराध्यक्ष राजेंद्र ठोंबरे, बाजार समिती संचालक गणेश दहीहंडे, माजी संचालक भास्कर मुरमे, भगवान वाघ, माजी सभापती राजू घोगरे, पंचायत समिती गटनेते अनुराग शिंदे, माजी जिल्हा परिषद सदस्य कल्याण शेळके, सरपंच भाऊसाहेब देवकर, नगरसेवक प्रशांत नांगरे, जमीर पठाण, पवन घोडके, मुदसर पटेल, उमेश दुतोडे, भीमराव पठाडे, आसिफ पटेल, राजेंद्र पळसकर, नारायण पळसकर, दादाराव पळसकर, परमेश्वर मते, तातेराव मते, पुंजाराम मते, प्रमोद मुठे, गौतम जाधव, राजू मते यांच्यासह नगरसेवक व सरपंचांचा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनीही शिवसेनेत प्रवेश केला.
शिंदेसेना फुलंब्रीच्या तयारीत
फुलंब्री विधानसभा मतदार संघ महायुतीत भाजपकडे आहे. परंतु, या मतदार संघात आता शिंदेसेनेने पक्ष बळकटीवर लक्ष केंद्रीत केले आहे. त्याचा पहिला फटका हा मित्र पक्ष भाजपलाच दिला आहे. मंगळवारी भाजपच्या अनेकांनी शिंदेसेनेत प्रवेश केल्याने फुलंब्रीत शिवसेनेचे पारडे जड होण्यास सुरुवात झाल्याची चर्चा आहे.