

People are angry due to the water supply being cut off in Gangapur city.
गंगापूर, पुढारी वृत्तसेवा गंगापूर शहराचा पाणीपुरवठा वीस दिवसांपासून बंद आहे. नगरपालिकेचा निषेध करीत अमोल जगताप मित्रमंडळाच्या वतीने नगरपालिकेच्या आवारात आंघोळ आंदोलन सोमवारी (दि.१६) केले.
मुख्य अधिकारी संतोष आगळे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गोदावरी नदीत जास्तीचा पाणीसाठा असूनही पाणीपुरवठा अधिकारी यांच्या मनमानी कारभारामुळे गंगापूर शहराचा पाणीपुरवठा एक महिन्यापासून बंद आहे. शहरातील नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे.
गेल्या तीस दिवसांपासून शहरातील विविध वॉर्डातील नागरिक हे पाण्यासाठी गंगापूर नगरपालिकेत चकरा मारत असून, याबाबत गंगापूर नगरपालिकेकडून पाण्याबाबत कुठलाही तोडगा काढण्यात आलेला नाही. त्यामुळे नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी अतिशय हाल अपेष्टा सोसाव्या लागत आहेत.
गेल्या अनेक दिवसांपासून गंगापूर शहरात विविध भागांत पाणीपुरवठा बंद असून, शहरात पंधरा ते वीस दिवस पाणी नाही याची सर्वस्वी जबाबदारी पाणीपुरवठा अधिकारी ठुबे यांची असल्याने त्यांना निलंबित करण्यात यावे यासह इतर मागण्यांचे निवेदन मुख्य अधिकारी संतोष आगळे यांना अमोल जगताप मित्रमंडळाच्या वतीने देण्यात आले.
या आंदोलनात अमोल जगताप, राहुल वानखेडे, रावसाहेब तोगे, खालेद नाहादी, ज्ञानेश्वर साबणे, बदर जहुरी, वाल्मिक शिरसाठ, अख्तर सय्यद, नवनाथ कानडे, करण खोमने, जाहेद सय्यद, अमोल म्हसरूप, अमर राजपूत, स्वप्निल गायकवाड, राहुल खाजेकर, किरण खाजेकर, मोरारजी पानकडे, इस्माईल बागवान, राहुल साळवे, अजय बत्तीशे, आकाश बुचडे, सलीम शेख, अंतू खाजेकर आदींसह युवकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता. पोलिस निरीक्षक कुमार सिंग राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पपोलिस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला होता.