Sambhajinagar News : रस्त्याअभावी शिक्षणाचा प्रवास खडतर
The journey to education is difficult due to lack of roads
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा: कन्नड तालुक्यातील माटेगाव येथील वस्तीला जोडणारा रस्त्याची गेल्या अनेक वर्षांपासून दुरवस्था असून, पावसाळ्यात या रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य पसरते. त्यामुळे शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना चिखल तुडवत शाळा गाठावी लागते. तसेच काही पालकांनी तर मुलांना बैलगाडीतून शाळेत पोहोचवले, ही बाब संतापजनक आहे.
एकीकडे सरकारने शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले असले, तरी दुसरीकडे मात्र विद्यार्थ्यांना शाळेत पोहोचण्यासाठी अडचणींचा डोंगर पार करावा लागल्याने रस्त्याअभावी शिक्षणाचा प्रवास खडतर झाला असल्याचे बोलले जात आहे.
दरम्यान माटेगावापासून फक्त दीड किलोमीटर अंतरावर असलेल्या वस्तीमध्ये सध्या २५ कुटुंबे राहतात. पूर्वी ही वस्ती तुरळक होती, मात्र आता लोकवस्ती वाढली असून, मुलांना शाळा आणि नागरिकांना रुग्णालयासाठी चिखल तुडवत जावे लागते. रस्त्याच्या प्रश्नावर गेल्या १५ ते २० वर्षांपासून ग्रामस्थांनी प्रशासनाकडे वेळोवेळी निवेदने दिली, तरीही आजपर्यंत कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही, असे गावातील शेख अनिस शेख उस्मान यांनी कळविले आहे.
विद्यार्थ्यांना तुडवावा लागतो चिखल
सध्या १२ मुली आणि १६ मुले दररोज सुमारे १ किलोमीटर चिखलातून शाळेत जातात. त्यांचे कपडे चिखलाने माखतात. त्यातही शाळेत पाय धुण्यासाठी पाण्याचीही व्यवस्था नाही. परिणामी, काही विद्यार्थी शाळा सोडण्याच्या विचारात आहेत, असे गावकऱ्यांनी सांगितले.
२० वर्षानंतही रस्त्याची अवस्था जैसे थे !
एकीकडे सरकार बेटी बचाओ, बेटी पढ़ाओ चा नारा देत असताना या मुलभूत समस्यांकडे दुर्लक्ष होत असल्याने ग्रामस्थ संतप्त आहेत. त्यांनी जिल्हाधिकारी व जिल्हा परिपद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे निवेदन देऊन तातडीने रस्ता तयार करण्याची मागणी केली आहे. मात्र २० वर्षानंतही रस्ताची अवस्था जैसे थे, आहे. त्यामुळे योग्य रस्त्याविना मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, ही त्यांची मागणी आहे.

