

Passenger satisfaction survey: Sambhaji Nagar ranks first in the country.
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा वर्षभरात १० लाख प्रवासी हाताळण्याची क्षमता असलेल्या एअरपोर्ट अथॉरिटी अंतर्गत असलेल्या देशातील सुमारे ६२ विमानतळांचा प्रवासी समाधान सर्व्हे नुकताच करण्यात आला. त्यात देशातील या ६२ विमानतळांत छत्रपती संभाजीनगर आंतरराष्ट्रीय विमानतळाने प्रथम क्रमांक पटकावला असल्याची माहिती विमानतळ प्राधिकरणाचे प्रमुख शरद येवले यांनी दिली.
विमानतळ अथॉरिटीने नुकतेच वर्षाला सुमारे १० लाख प्रवासी हाताळणे, प्रवाशांना विमानतळांवर पुरवण्यात येणारी सुरक्षा, सेवा व इतर सुविधांचे सर्वेक्षण जुलै ते डिसेंबर २०२५ दरम्यान करण्यात आले. या सर्वेक्षणात ग्राहक समाधान सर्वेक्षणात (दुसऱ्या राऊंडमध्ये) येथील विमानतळाने प्रथम क्रमांक पटकावला आहे. यावेळेस पाच पैकी ४.९९ अशी रेटिंग मिळाली आहे. यापूर्वी म्हणजे २०२४ मध्ये ४.८७ (१३ वे रैंक) (राउंड-२) वरून २०२५ मध्ये ४.९३ (आठवे रैंक) पर्यंत सुधारले होते. २०२५ च्या दुसऱ्या फेरीत प्रथम क्रमांकावर पटकावला आहे.
सुधारणांचे मिळाले फळ
२०२५ मध्ये विमानतळावर अनेक नवीन सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. जसे की टर्मिनल इमारतीतील सर्व ११ शौचालयांचे नूतनीकरण, याला प्रवाशांकडून स्वच्छतेबाबत चांगला प्रतिसाद मिळत आहे, पार्किंग क्षेत्रात ईव्ही चार्जिंग स्टेशन सुरू करणे, लहान प्रवाशांसाठी टर्मिनल इमारतीत चाईल्ड प्ले एरिया तयार करणे, ग्रंथालय, लॅपटॉप चार्जिंग स्टेशन सुरू करणे, गर्दीच्या वेळी ८०० वरून २८५० पर्यंत पुनर्रचना केल्यानंतर विमानतळ हाताळणी क्षमता वाढवणे आदी सुधारणा केल्याने हे फळ मिळाल्याचेही येवले यांनी सांगितले.