Beef smuggling Paithan| पैठण-बालानगर परिसरात पोलिसांचा छापा; गोवंश कत्तलप्रकरणी ६ जणांवर कारवाई, २१५ किलो मांस जप्त
पैठण: पैठण शहर आणि बालानगर परिसरात अवैधपणे गोवंश कत्तल करून मांस विक्री करणाऱ्यांविरुद्ध पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. शुक्रवारी (दि. २६) पैठण आणि एमआयडीसी पोलिसांनी केलेल्या या संयुक्त कारवाईत एकूण ६ जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले असून, सुमारे २१५ किलो मांस आणि कत्तलीचे साहित्य जप्त करण्यात आले आहे.
शहर आणि ग्रामीण भागात पोलिसांचे छापे
उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पैठण पोलिसांनी शहरातील कुरेशी मोहल्ला येथे छापा टाकला. यावेळी गोवंश कत्तल आणि मांस विक्री सुरू असल्याचे समोर आले. या कारवाईत पोलिसांनी सर्फराज जानी कुरेशी, बिलाल फारूक कुरेशी आणि फिरोज फारूक कुरेशी यांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून २० किलो मांस जप्त केले. याच परिसरातून शरीफ रशीद कुरेशी याच्या ताब्यातून ४५ किलो मांस आणि कत्तलीसाठी लागणारे सत्तूर व इतर साहित्य जप्त करण्यात आले.
बालानगर शिवारात आरोपींचा पळ काढण्याचा प्रयत्न
दुसरीकडे, एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सपोनि ईश्वर जगदाळे यांच्या पथकाने बालानगर शिवारातील एका शेतात धाड टाकली. तेथे रफिक शेख आणि आसिफ शेख हे गोवंश कत्तल करून मांस विक्री करत होते. मात्र, पोलीस पथकाला पाहताच दोन्ही आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला. पोलिसांनी या ठिकाणाहून १५० किलो मांस, चाकू आणि इतर साहित्य जप्त केले आहे.
पुढील तपास सुरू
या दोन्ही कारवायांमध्ये एकूण २१५ किलो मांस हस्तगत करण्यात आले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास एमआयडीसीचे सपोनि ईश्वर जगदाळे आणि पैठण पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक संभाजी खाडे करत आहेत. या कारवाईमुळे अवैध कत्तल करणाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

