

Parents Flee After Abandoning Infant on Road in Mukundwadi
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : मुकुंदवाडी परिसरातील राजनगर भागात सोमवारी (दि.६) सकाळी ११ वाजेच्या सुमारास रस्त्यावर ४ ते ५ महिन्यांचे अर्भक बेवारस अवस्थेत आढळून आले. याप्रकरणी मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात अज्ञात महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राजनगरमधील जगताप शाळेकडे जाणाऱ्या रस्त्यावर, गेट क्रमांक ५६ जवळ हे अर्भक पडलेले असल्याचे स्थानिकांच्या निदर्शनास आले. या घटनेची माहिती मिळताच सहाय्यक निरीक्षक संजय बहुरे यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी अर्भक ताब्यात घेऊन पुढील वैद्यकीय तपासणीसाठी तातडीने घाटी रुग्णालयात हलवले आहे.
पोलिसांनी वर्तवलेल्या प्राथमिक अंदाजानुसार, जन्म लपवण्याच्या उद्देशाने या अर्भकाची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला असावा. हा रस्ता वर्दळीचा असून, जवळच एक मोठा नाला आहे.
अर्भकाला नाल्यात फेकण्यासाठी नेत असताना रस्त्यावरील खड्ड्यात दुचाकी आदळल्याने ते अर्भक चुकीने खाली पडले असावे, असा दाट संशय व्यक्त केला जात आहे. या प्रकरणाचा पुढील तपास हवालदार सुशील रत्नपारखे करत असून, परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे त्या अज्ञात महिलेचा शोध घेतला जात आहे.