MLA Suresh Dhas : शेतकऱ्यांची पत वाढली, तरच देशाची खरी प्रगती

आ. सुरेश धस यांचे प्रतिपादन; धामणगाव येथे उप बाजारपेठेचे उद्घाटन
MLA Suresh Dhas
MLA Suresh Dhas : शेतकऱ्यांची पत वाढली, तरच देशाची खरी प्रगतीFile Photo
Published on
Updated on

The country will achieve true progress only if the financial standing of farmers improves MLA Suresh Dhas

आष्टी : पुढारी वृत्तसेवा: शेतकऱ्यांच्या कष्टाला बाजारपेठेची मजबूत साथ मिळाल्यासच ग्रामीण अर्थव्यवस्था बळकट होते, आणि हाच विश्वास कडा कृषी उत्पन्न बाजार समितीने गेल्या अनेक वर्षांत प्रत्यक्ष कृतीतून सिद्ध केला आहे. शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणाऱ्या या सहकारी संस्थेमुळे कडा परिसरातील कांदा थेट परदेशात निर्यात होत असून, तालुक्याच्या कृषी अर्थव्यवस्थेत बाजार समितीचा मोलाचा वाटा आहे, शेतकऱ्यांची पत वाढली तरच देशाची खरी प्रगती होईल असे प्रतिपादन आमदार सुरेश धस यांनी केले.

धामणगाव येथे कृषी उत्पन्न बाजार समिती, कडा यांच्या उपबाजार पेठेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी आमदार धस यांनी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या माध्यमातून कडा बाजार समितीच्या आवारात पाच कोटी रुपयांचे अंतर्गत सिमेंट रस्ते मंजूर करण्यात येणार असल्याची महत्त्व पूर्ण घोषणा केली.

धामणगाव येथे उपबाजार पेठ सुरू व्हावी, ही मागणी तब्बल वीस वर्षांपासून प्रलंबित होती. आमदार सुरेश धस तसेच बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे हा प्रश्न अखेर मार्गी लागल्याचे यावेळी सांगण्यात आले. उपबाजार सुरू झाल्याने परिसरातील शेतकऱ्यांची मोठी सोय झाली असून, आष्टी तालुका कांदा उत्पादक म्हणून अधिक सक्षमपणे पुढे येणार आहे.

आमदार धस म्हणाले की, पूर्वी येथील कांदा अहिल्यानगरला पाठवावा लागत असल्याने वाहतुकीचा अतिरिक्त खर्च शेतकऱ्यांना सहन करावा लागत होता. आता धामणगाव येथेच बाजारपेठ उपलब्ध झाल्याने हा खर्च वाचून शेतकऱ्यांना अधिक दर मिळणार आहे. धामणगाव परिसरातील शेतकऱ्यांची अनेक वर्षांची अपेक्षा पूर्ण झाल्याचा आनंद त्यांनी व्यक्त केला.

उपबाजारासाठी जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल प्रशांत गोडसे यांचे आभार मानत आमदार धस यांनी सांगितले की, सध्या २४ मोठे व ६ लहान प्लॉट असलेली जागा बाजार समितीने भाडेतत्त्वावर घेतली असून, भविष्यात स्वतःची जागा खरेदी करून विस्तारित व सुसज्ज बाजार समिती उभारण्याचा मानस आहे. धामणगाव ते हातोला फाटा रस्त्याचे काम तात्काळ सुरू होणार असून, म्हसोबावाडी ते धामणगाव हा २८ किलोमीटरचा डांबरी रस्ता एका महिन्यात पूर्ण केला जाणार आहे.

तसेच बोरडवाडी ते जाट देवळा रस्त्याचे कामही मंजूर झाले असून तत्काळ सुरू करण्याच्या सूचना देण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. शेतकऱ्यांची पत वाढली, तरच देशाची खरी प्रगती होईल, असे सांगत आमदार धस यांनी कांदा लागवडीत आधुनिक तंत्रज्ञान, दर्जेदार बियाणे, संतुलित खत व औषधांचा वापर करण्याचे आवाहन केले. तसेच विजेच्या समस्येवर उपाय म्हणून मुख्यमंत्री सौर ऊर्जा पंप योजनेचा लाभघेण्याचे सुचविले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना माजी आमदार साहेबराव दरेकर यांनी सांगितले की, धामणगाव परिसरात कांदा उत्पादन मोठ्या प्रमाणावर असून, आता नगर-पुण्याकडे जाणारा कांदा थेट धामणगाव बाजारपेठेत येणार आहे. बाजार समित्यांमुळे शेतकऱ्यांना योग्य दर मिळून ते आर्थिकदृष्ट्‌या सक्षम होत असल्याचे त्यांनी नमूद केले.

या कार्यक्रमास माजी आमदार, सभापती, उपसभापती, सरपंच, संचालक, अधिकारी, व्यापारी तसेच परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन अनिल ढोबळे यांनी केले, तर आभार प्रदर्शन सचिव हनुमंत गळगटे यांनी मानले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news