

पैठण :-पैठण तालुक्यातील अगर नांदर येथील शेती जमीन वाटणीपत्र तयार करून देण्यासाठी सोमवार दि.४ रोजी तहसील कार्यालयात एका तक्रारदार शेतकऱ्याकडून लाच घेताना रंगेहाथ पकडलेले तलाठी अक्षय बिनीवाले व कोतवाल सोमनाथ कोल्हे यांना पैठण न्यायालयाने तीन दिवस कोठडी सुनावली आहे.
अगर नांदर येथील एका शेतकरी तक्रारदाराकडून वाटणीपत्र तयार करण्यासाठी ८ हजार रुपये लाच घेताना रंगेहाथ पकडले आपेगाव चे तलाठी अक्षय बिनीवाले व कोतवाल सोमनाथ कोल्हे यांना मंगळवारी दि.५ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या तपास अधिकारी पोलीस निरीक्षक चैनसिग गुशिंगे यांच्या पथकाने पैठण येथील न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने या दोन्ही लोकसेवक आरोपींना तीन दिवस कोठडी सुनावली आहे.
दरम्यान छत्रपती संभाजी नगर येथील लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने या दोन्ही तलाठी व कोतवाल यांना मंगळवारी रोजी तीन वाजेच्या दरम्यान पैठण न्यायालयात आणले होते. परंतु आरोपी संदर्भात महत्त्वाची नोंद घेतलेली संचिका या आरोपीच्या सोबत न्यायालयात दाखल न केल्यामुळे न्यायालयाने सदरील संचिका तात्काळ दाखल करण्याचा आदेश दिल्यामुळे ला सूजपत प्रतिबंधक विभागाच्या तपास पथकातील अधिकाऱ्यांनी तातडीने छत्रपती संभाजी नगर येथील कार्यालयात जाऊन संचिका नोंदवही आणून दाखल केली. त्यामुळे या प्रक्रियेला रात्री उशिरा झाला असल्याने पैठण न्यायालयाच्या परिसरात लोकसेवक आरोपीचे संबंधित नातेवाईक व महसूल विभागातील कर्मचारी यांनी गर्दी केली होती.