

नितीन थोरात
वैजापूर : उलटी वाहती गंगा नावाने जिल्ह्यात परिचित असणाऱ्या श्री.रामकृष्ण गोदावरी उपसा सहकारी जलसिंचन योजनेतील १४ गावातील २ हजार २१७ शेतक-यांच्या सातबारा उता-यावरील बोजा कमी झाला आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे ६४ कोटी २६ लाख ५९ हजार रुपयेचे थकीत कर्ज रक्कम माफ झाले आहे.
कर्जमाफीचा निधी जिल्हा बँकेने वितरित केल्यानंतरही अनेक शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर कर्ज दाखवत असल्याचे लक्षात आल्यानंतर तो बोजा सात दिवसात काढा अशी सूचना आमदार रमेश बोरनारे यांनी महसूल कर्मचारी अधिकाऱ्यांना दिल्या आहे. या सुचेनेमुळे प्रशासनाच्या गतिमान हालचाली सुरू झाल्या असून पुढील सात दिवसांत सर्व कर्जबाजारी शेतकऱ्यांचे सातबारे कोरे होतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. हा निर्णय केवळ आर्थिक दिलासा न राहता शेतकऱ्यांच्या आत्मविश्वासात भर घालणारा ठरला आहे. आमदार बोरनारे यांच्या प्रयत्नामुळे शेतकऱ्यांच्या जीवनातली ही खरी दिवाळी ठरत आहे.
शेतकऱ्यांचा हा प्रश्न मार्गी लागणार..
या सातबारावरती हा बोजा असल्याने या शेतकऱ्यांना आपल्या हक्काच्या शेत जमिनीच्या व्यवहारा सोबत पीक कर्ज काढण्यास अडचण होती . त्यामुळे शेतकऱ्याजवळ असणारी शेती असून नसल्यासारखाच प्रकार होता. त्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आले होते. मात्र या कर्जमाफीनंतर या शेतकऱ्यांच्या तोंडामध्ये अखेर साखरेचा खडा पडणार आहे. अन् शेतकऱ्यांचा हा प्रश्न मार्गी लागणार आहे.
ही कर्ज माफी केवळ, महायुतीच्या सरकारमुळे शक्य झाली आहे. गेल्या 35 वर्षांपासून रखडलेला मतदार संघाचा हा प्रश्न माझ्या हातून मार्गे लागला हे माझं भाग्य. कर्जमाफी झाल्यानंतर शेतकऱ्यांचा संपूर्णपणे सातबारा कोरा करून घेणे हे माझं काम आहे. शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून हाच माझ्या मतदारसंघाचा विकास आहे असे मला अभिमानाने सांगायला अभिमान वाटेल..
रमेश बोरनारे ( शिवसेनेचे मुख्य प्रतोद तथा आमदार वैजापूर गंगापूर मतदार संघ)