

Bulldozers on 477 encroachments on Paithan Road
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा शहरातील बीड बायपास, जालना रोडवरील कारवाईनंतर महापालिकेने सोमवारी (दि.३०) सकाळी पैठण रोडवर वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या अतिक्रमणांवर कारवाईला सुरुवात केली. या मोहिमेत ४७७ अनधिकृत टपऱ्या, दुकाने, फूटपाथवरील अडथळे हटवण्यात आले.
मनपा हद्दीतील सुमारे अकरा किलोमीटरच्या अंतरावरील रस्त्याच्या दोन्ही बाजूंची अतिक्रमणे, अनधिकृत बांधकामे पाडण्यास सुरुवात करण्यात आली आहे. यावेळी महानुभाव आश्रमाला लागून असलेल्या माजी महापौर नंदकुमार घोडेले यांच्या जा-गेवरील व्यावसायिक बांधकाम पाडण्यात आले. तर काही राजकीय नेते, पदाधिकाऱ्यांच्या मालमत्तांवरद-खील बलडोजर चालविण्यात आला. पैठण रोडवरील सुमारे चौदाशे बांधकामांवर कारवाई केली जाणार असल्याचे महापालिकेच्या अतिक्रमण हटाव विभागाचे प्रमुख संतोष वाहुळे यांनी सांगितले.
शहरातील प्रमुख रस्ते अतिक्रमणमुक्त करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. त्याला पोलिस प्रशासनाचेही समर्थन असून या कारवाईसाठी मोठा पोलिस बंदोबस्त उपलब्ध करून देण्यात आला आहे. महापालिकेने सुरुवातीला बीड बायपास रस्त्यावर कारवाई करून रस्त्याच्या दोन्ही बाजूचे सर्व्हिस रोड अतिक्रमणमुक्त केले. त्यानंतर जालना रोडवरील एपीआय कार्नर, मुकुंदवाडी, चिकलठाणासह केंब्रीज चौकापर्यंत अतिक्रमण हटविण्याची कारवाई केली. दरम्यान पैठण रोड हा वर्दळीचा रस्ता असून येथील अतिक्रमणांमुळे नागरिकांसह वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. अनेक ठिकाणी दुकानदारांनी फूटपाथ आणि रस्त्याचा भाग व्यापून ठेवल्याने पादचाऱ्यांसाठी जागाच शिल्लक नव्हती.
या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्तांनी कठोर भूमिका घेत अतिक्रमण हटविण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार सोमवारी सकाळी नऊ वाजता मोठ्या फौजफाट्यासह मनपाच्या पथकाने महानुभाव आश्रमाला लागूनच माजी महापौर नंदकुमार घोडेले यांच्या जागेवर थाटण्यात आलेले दुकान पाडले. तसेच महानुभाव आश्रमची संरक्षक भिंत व मंदिराचा काही भागही बाधित होत आहे.
मार्किंगनंतर आश्रमाच्या व्यवस्थापनाने स्वतःहून बांधकाम काढून घेण्यास सुरुवात केली. तर आश्रमाच्या शाळेसह पैठण रोडवरील काही उद्योजकांना त्यांच्या मालमत्ता काढून घेण्यासाठी १५ ऑगस्टपर्यंत मुदत देण्यात आली. मनपा पथकाकडून रस्त्यासाठी बाधित ४७७ अतिक्रमण हटवण्यात आले. तसेच शहरातील इतर अतिक्रमित भागतही लवकरच अशाच प्रकारची मोहीम राबवली जाणार असल्याचे महापालिकेने जाहीर केले आहे. दरम्यान पैठण रस्त्याच्या रुंदीबद्दल नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.
छत्रपती संभाजीनगर ते पैठण या रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या माध्यमातून करण्यात आले आहे. या प्राधिकरणाने रस्त्याची तीस मीटर रुंदी गृहीत धरून (दुभाजकाच्या एका बाजूला पंधरा मीटर आणि दुसऱ्या बाजूला पंधरा मीटर) रस्त्याचे काम केले आहे. मात्र महापालिका साठ मीटर रुंदीचा रस्ता गृहीत धरून बांधकामे पाडण्याची कारवाई करीत आहे. त्यामुळे रस्त्याची रुंदी नेमकी किती असा प्रश्न नागरिकांतून उपस्थित करण्यात आला आहे.
रस्त्याची रुंदी नेमकी किती याबद्दल पत्रकारांशी बोलताना पालिकेच्या अतिक्रमण हटाव विभागाचे प्रमुख संतोष वाहुळे म्हणाले, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाची मालकी दुभाजकाच्या एका बाजूने पंधरा मीटरची आहे. त्यानंतरची पंधरा मीटरची जागा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मालकीची आहे. या जागेवर कारवाई केली जात आहे.
पालिकेने ज्या मालमत्ताधारकांना बांधकाम परवानगी दिली आहे अशा मालमत्ताधारकांची संख्या फारच कमी आहे, अशी बांधकामे अनधिकृत बांधकामे म्हणून समजली जातात. या बांधकामांवर कारवाई करण्याचा पूर्ण अधिकार महापालिकेला आहे. ज्यांच्याकडे बांधकाम परवानगी आहे व त्यांचे बांधकाम साठ मीटर रुंदीत बाधित होत आहे अशांना पालिका टीडीआरच्या स्वरुपात मोबदला देणार आहे. संबंधितांनी प्रस्ताव सादर केल्यावर पालिका सात दिवसांत त्यांना टीडीआर देण्याची प्रक्रिया पूर्ण करणार आहे.
या कारवाईदरम्यान ४७७ टपऱ्या, अनधिकृत गाळे आणि भाजीपाल्याचे हातगाडे हटवण्यात आले. काही ठिकाणी स्थानिक व्यापाऱ्यांनी विरोध दर्शवण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिस बंदोबस्तामुळे कारवाई सुरळीत पार पडली.
अतिक्रमण हटवण्याची ही कारवाई केवळ एकदाच न होता, सातत्याने केली जाईल. अतिक्रमण करू नये, अन्यथा कठोर कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा महापालिकेकडून देण्यात आला.