

पैठण : पैठण येथील पोलीस ठाण्याच्या आवारात असलेल्या महिला समुपदेशन केंद्रात सुरु असलेले प्रकरण मिटविण्यासाठी आठ हजार रुपयाची लाच घेताना दोन कंत्राटी महिला कर्मचाऱ्यांना मंगळवारी (दि.२३) रोजी छत्रपती संभाजीनगर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले.
याबाबत अधिक माहिती अशी की, पैठण येथील पोलीस ठाण्याच्या आवारात असलेल्या महिला समुपदेशन केंद्रात एका महिलेने पती-पत्नीच्या वादा संदर्भात तक्रारी अर्ज दाखल केला होता. याप्रकरणी समुपदेशन केंद्रात सुनावण्या सुरु होत्या. सदरील प्रकरण मिटविण्यासाठी या तक्रारदार महिलेला दहा हजार रुपयाची लाचेची मागणी या केंद्रातील समुपदेशन करणाऱ्या कंत्राटी महिला कर्मचारी ज्योती इंदर शेजुळ (रा. नवीन कावसान पैठण) , विजय यादव भंडारी (कंत्राटी समुपदेशन कर्मचारी राहणार भीमनगर भावसिंगपुरा छत्रपती संभाजीनगर) यांनी केली होती.
परंतु तक्रारदार महिलेला लाच देण्याची इच्छा नसल्यामुळे तडजोडी अंती आठ हजार रुपये देण्याचे ठरले. परंतु लाच देण्याची इच्छा नसल्याने या तक्रारदार महिलेने छत्रपती संभाजीनगर येथील लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. त्यानुसार मंगळवारी (दि.२३) रोजी सायंकाळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पैठण पोलीस ठाण्याच्या आवारात सापळा रचून तक्रारदार महिलेकडून लाचेची आठ हजार रुपयाची रक्कम घेतानी रंगहाथ पकडले आहे.
रात्री उशिरापर्यंत पैठण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. सदरील सापळा यशस्वी करण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक माधुरी केदारे कांगणे, अप्पर पोलीस अधीक्षक शशिकांत शिंगारे यांच्या मार्गदर्शनाखाली ला.प्र.वि पोलीस निरीक्षक संतोष तिगोटे, पोलीस निरीक्षक राजू नागलोत, पो.हे शिवकर, साईनाथ तोडकर, म.पो.हे. पुष्पा दराडे, रामेश्वर ताठे या कारवाई यशस्वी केली.