

पैठण : संत एकनाथ महाराजांच्या नाथषष्ठी यात्रेनिमित्त पैठण नगरीत लाखो वारकरी भाविक येणार असल्याने त्यांच्या सुरक्षेसाठी पोलिस प्रशासनाने तगडा बंदोबस्त तैनात करण्याचे नियोजन केले आहे. यात्रेच्या पार्श्वभूमीवर पाकिटमारी, पोत व किमती वस्तू चोरणाऱ्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारांवर प्रतिबंधक कारवाईची मोहीम राबविण्यात येत असल्याची माहिती पोलिस निरीक्षक महादेव गोमारे यांनी दिली.
दरवर्षीप्रमाणे नाथषष्ठी यात्रेदरम्यान राज्यातील विविध भागांतून मोठ्या संख्येने वारकरी पैठणमध्ये दाखल होतात. यामध्ये महिला भाविकांची संख्या लक्षणीय असते. त्यामुळे भाविकांच्या सुरक्षिततेसाठी विशेष खबरदारी घेण्यात आली आहे.
पोलिस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड, अप्पर पोलिस अधीक्षक अन्नपूर्णा सिंह व उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली यात्रेदरम्यान 1 डीवायएसपी, 2 पोलिस निरीक्षक, 32 उपनिरीक्षक, 8 सहायक पोलिस उपनिरीक्षक, 345 पोलिस कर्मचारी, 76 महिला कर्मचारी, वाहतूक शाखा, गुन्हे शाखा पथक, दंगा नियंत्रण पथक तसेच 178 पुरुष व महिला होमगार्ड असा मोठा बंदोबस्त तैनात केला जाणार आहे.
याशिवाय साध्या वेशातील पोलिस कर्मचारी व दामिनी पथकही सज्ज ठेवण्यात येणार आहे.या बंदोबस्तासाठी छत्रपती संभाजीनगर, बीड, धाराशिव व जालना जिल्ह्यांतील पोलिस कर्मचाऱ्यांचीही नियुक्ती करण्यात आली आहे. संत एकनाथ महाराजांची दोन्ही मंदिरे, बसस्थानक परिसर, धरण व गोदावरी नदी वाळवंट परिसर तसेच यात्रा मैदानातील मनोरंजन स्टॉल परिसरात विशेष पोलिस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.
तहसील परिसरात पार्किंग व्यवस्था
9 ते 11 मार्च दरम्यान यात्रेसाठी बाहेरगावाहून येणाऱ्या भाविकांच्या वाहनांसाठी शहरालगतच्या गोल नाका व तहसील कार्यालयासमोर तात्पुरती पार्किंग व्यवस्था करण्यात येणार आहे. मान्यवर व्यक्तींसाठी वाहन प्रवेश पासची व्यवस्था करण्यात येणार असून शहरातील व्यापारी व नागरिकांनी अत्यावश्यक प्रसंगीच वाहनांचा वापर करून पोलिस प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.