

Paithan Municipal Council election
पैठण: दक्षिण काशी पैठण शहरासह संत ज्ञानेश्वर उद्यानाच्या विकासासाठी मोठा निधी उपलब्ध करून दिला जाईल. लाडक्या बहिणींच्या पाठीमागे खंबीर उभा राहणार आहे. ग्रामीण भागातून रोजगारासाठी मोठ्या प्रमाणावर तरुण शहरामध्ये येत आहेत. त्यामुळे राज्यकर्त्यांनी शहराच्या विकासाकडे लक्ष देणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
नगर परिषद निवडणुकीतील भाजप पक्षाच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ पैठण येथे सोमवारी (दि.१) आयोजित केलेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, भागवत कराड, आमदार अनुराधा चव्हाण आदीसह भाजपचे नेते पदाधिकारी उपस्थित होते.
येथील छत्रपती शिवाजी चौकामध्ये पैठण नगर परिषद निवडणुकीत भाजप पक्षाच्या वतीने नगराध्यक्ष पदासाठी मोहिनी लोळगे व बारा प्रभागातील भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी प्रचार सभा झाली. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, संताची भूमी असलेल्या दक्षिण काशी पैठण शहरामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली गरिबांना मोठ्या घराचा निवारा उपलब्ध करून देण्यात आलेला आहे.
यासह दोन हजार घरकुल योजना राबविण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने तात्काळ मंजुरी देण्यात आली आहे. नाथसागर धरणातून गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग करताना शहरातील पूरस्थिती निर्माण होते. यावर उपाय म्हणून गोदावरी नदी काठावर सुरक्षा भिंत व अन्य उपाय योजना राबविण्यात येणार आहेत.
नाथसागर धरणाच्या पाण्यावर अवलंबून असणाऱ्या मच्छीमारांना धरण परिसरात मासेमारी करण्यासाठी योग्य नियोजन केले जाणार आहे. याबाबत येत्या अधिवेशनात निर्णय घेण्यात येणार आहे. भाजपच्या वतीने निवडणूक लढविणाऱ्या सर्व उमेदवारांना मोठ्या मतांनी निवडून देण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.
याप्रसंगी भाजप नेते तुषार सिसोदे, रेखा कुलकर्णी, लक्ष्मण औटे, माजी नगराध्यक्ष सुरज लोळगे, ज्ञानेश्वर दहिवाळ, योगेश गव्हाणे, सिद्धार्थ परदेशी, विशाल पोहेकर, सुरेश गायकवाड, विजय चाटूफळे, सतीश आहेर, अक्षय कुलथे, लक्ष्मीकांत पसारे आदीसह उमेदवार, महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या.