

छत्रपती संभाजीनगर : पैठण गेट परिसरात सोमवारी (दि.10) रोजी रात्री एका तरुणाचा चाकूने भोसकून निर्घूण खून करण्यात आला. या घटनेनंतर महापालिकेने येथील अनधिकृत दुकाने स्वतःहून काढून घेण्यासाठी दोन दिवस मुदतीची नोटीस बजावली आहे. त्यानंतर जेसीबीद्वारे दुकाने जमीनदोस्त करण्यात येईल, असा इशारा महापालिकेच्या झोन २ कार्यालयाने दिला आहे.
मुकुंदवाडीत चार महिन्यांपूर्वी झालेल्या खुनाच्या घटनेनंतर महापालिकेने येथील तब्बल तीनशे हून अधिक अनधिकृत दुकाने आणि हॉटेल्स, टपऱ्यांवर कारवाई करीत त्या जमीनदोस्त केल्या होत्या. यासोबतच शहरातील विविध रस्त्यांवर असलेल्या अनधिकृत दुकानांवर देखील कारवाई करण्यात आली होती. त्यात सोमवारी (दि.10) रात्री पैठण गेट परिसरातदेखील खुनाची घटना घडली. यात एका तरुणाचा चाकूने भोसकून निघृण खून करण्यात आला होता. या घटनेनंतर परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिस प्रशासनाकडूनदेखील बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.
दरम्यान, मंगळवारी सिल् लेखाना येथील मृत तरुणाच्या नातेवाईकांसह इतर नागरिकांनी झोन २ कार्यालय गाठले. त्यानंतर झोन अधिकारी रमेश मोरे यांची भेट घेतली. त्यांना निवेदन देत पैठण गेटची अनधिकृत दुकाने काढण्यात यावी, अशी मागणी केली. यावेळी शेकडो नागरिकांचा जमाव झोन कार्यालय परिसरात एकत्र आला होता.
अतिक्रमण काढून घेण्याची सूचना
या अनधिकृत दुकानांमुळे वाढणारी गुन्हेगारीच्या घटना वाढताय, अशी ओरड होत असल्याने महापालिकेच्या झोन कार्यालयाने येथील सर्व अनधिकृत दुकानांना नोटीस बाजावून स्वतःहून अतिक्रमण काढून घेण्याची सूचना केली. त्यासाठी दोन दिवसांची मुदत दिली आहे. या कालावधीत अतिक्रमण काढले नाही. तर महापालिका जेसीबीद्वारे जमीनदोस्त करणार आहे.