

पैठण : येथील शिशु विहार समोरील मेन रोडवर कार व मोटरसायकलचा भीषण अपघात झाल्याची घटना शुक्रवारी (दि.९) रात्री घडली. या अपघातात पैठण नगरपरिषदचे माजी उपाअध्यक्ष तथा संत एकनाथ साखर कारखान्याचे संचालक भाऊसाहेब पिसे व ना. पुसेगाव ता.पैठण येथील जिल्हा परिषद शिक्षक संभाजी कर्डिले यांचा जागीच मृत्यू झाला आहे. अपघाताची माहिती शहरात मिळतात नागरिकांनी शासकीय रुग्णालयात मोठी गर्दी केली होती.
अधिक माहिती अशी की. पैठण नगरपरिषद माजी उपअध्यक्ष तथा संत एकनाथ साखर कारखान्याचे संचालक भाऊसाहेब पिसे (वय-४० वर्ष) व त्यांचे मित्र ना. पुसेगाव येथील जिल्हा परिषद शिक्षक संभाजी कर्डिले (वय ४८ वर्ष) हे मोटरसायकलवर घरी जात असताना अचानक शेवगाव मार्गे येणाऱ्या कारची जोरदार समोर समोर धडक झाल्याने हा अपघात घडला.
हा अपघात एतका भीषण होता की, विषय आणि कर्डिले यांच्या अंगाचे मास तुकडे होऊन रस्त्यावर पडले होते. अपघात घडताच बेशुद्ध अवस्थेत दोघांना येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. परंतु वैद्यकीय अधिकारी यांनी तपासून मयत घोषित केल्यामुळे शहरातील विविध राजकीय पक्षाचे पदाधिकाऱ्यासह नागरिकांनी हळहळ व्यक्त करून रुग्णालयात गर्दी केली होती. दरम्यान या अपघात प्रकरणी पैठण पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक महादेव गोमारे यांनी दिली आहे.