

Paithan election shinde sena Sandipan Bhumre MLA Vilas Bhumre win
पैठण : मोहन ठाकूर
पैठण : पैठण शहराच्या राजकारणात यंदाची निवडणूक अत्यंत चुरशीची ठरली आहे. स्थानिक प्रश्न, विकासकामे आणि राजकीय समीकरणे कोणाच्या बाजूने झुकतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरले. शहराला नवा कारभारी कोण मिळेल, याची उत्सुकता लागली होती. या निकालामुळे शहराच्या राजकीय दिशा आणि पुढील पाच वर्षांचा विकासाचा मार्ग निश्चित झाला आहे. शिंदेसेनेने गड राखण्यात मोठे यश मिळवले आहे.
पैठण नगरपालिकेची निवडणूक प्रतिष्ठेची करत विरोधकांना पूर्णपणे नेस्तनाबूत करून खासदार संदीपान भुमरे व पुत्र आमदार विलास भुमरे यांनी भाजपकडील नगराध्यक्षपदासह तब्बल १७ नगरसेवक शिंदेसेनेकडे खेचून आणण्यासह मोलाची भूमिका बजावली आहे.
या नगरपालिकेवर शिंदेसेनेच्या वर्चस्वामुळे ही निवडणूक एकतर्फी झाली असून, खासदार संदीपान भुमरे, आमदार विलास भुमरे या पितापुत्रांचे नियोजन, शिस्तबध्द व जादुई प्रचाराने मतदारांवर एक प्रकारे भुरळ तर घातलीच शिवाय आपल्या उमेदवारांसाठी मतदान खेचण्यातही मोठ्या प्रमाणात यशस्वी झाल्याचे दिसून आले. त्यामुळेच शिंदेसेनेचे विद्या भूषण कावसानकर या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजयी झाल्या आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा पैठण तालुक्यातील राजकारणावर खासदार संदीपान पा. भुमरे यांची करिष्माई पकड मजबूत असल्याचे यानिमित्त पुन्हा एकदा अधोरेखित झाल्याचे पाहावयास मिळाले आहे.
विकासकामांवर जोर
पैठण नगरपालिकेची ही निवडणूक आरोप प्रत्यारोपांनी चांगलीच गाजली. निवडणुकीच्या प्रचार मैदानात उबाठागटासह काँग्रेस भाजपने शिंदेसेनेचे खासदार संदीपान भुमरे आमदार विलास भुमरे यांच्यावर वैयक्तिक टीकेची झोड उडवली होती.
भुमरे पितापुत्र विरोधकांच्या टीकांकडे दुर्लक्ष करून विकास मुद्दा समोर मांडून निवडणुकीस सामोरे गेले. गेल्यावेळी पेक्षा या निवडणुकीत मतांचा टक्काही वाढला आहे. खासदार संदीपान भुमरे, आमदार विलास भुमरे यांनी निवडणुकीच्या प्रचारादरम्यान दहा-बारा दिवस पैठणमध्ये ठाण मांडून प्रत्येक वॉर्डात जाऊन प्रचार यंत्रणा प्रभाविपणे राबवली.
आमदार विलास भुमरे यांनी वडील खासदार संदीपान भुमरे यांनी केलेली कोट्यवधींची विकासकामे प्रचारातून मांडली. विरोधकांच्या भूलथापांना बळी न पडता विकासाला साथ देण्याचे आवाहन केल्याने मतदारांनी शिंदेसेनेला मतदान केल्याचे या निकालावरून दिसले. आमदार झाल्यानंतर विलास भुमरे यांची ही पहिलीच निवडणूक होती. यात त्यांना नगरपालिका आपल्या ताब्यात घेण्यात यश आल्याने शिंदेसेनेची या निमित्ताने पकड मजबूत झाल्याचे दिसते.