

Shiv Sena's expected victory, BJP's defeat
सिल्लोड : येथील नगरपरिषद निवडणूक निकाल राजकीय गणितांच्या अपेक्षेप्रमाणे लागला. नगराध्यक्षपदाचे शिवसेनेचे (शिंदे गट) उमेदवार अब्दुल समौर २३ हजाररांपेक्षा आधिक विक्रमी मताधिक्याने विजयी झाले. तर भाजपचे उमेदवार मनोज मोरेल्लू यांचा पराभव झाला.
२८ नगरसेवकांपैकी शिवसेनेचे २५, तर भाजपचे ३ नगरसेवक निवडून आले. यात प्रतिष्ठेच्या काही प्रभागांमध्ये भाजपने तर काही प्रभागांमध्ये शिवसेनेने बाजी मारली. इतर पक्षांचे उमेदवार फारसा करिष्मा दाखवू शकले नाही. नगरपरिषद निवडणुकीत शिवसेना, भाजप, वंचित बहुजन आघाडी, कॉंगेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेनेसह (उबाठा) अपक्ष उमेदवार निवडणूक रिंगणात होते.
यात शिवसेना व भाजपमध्येच सरळ लढत झाली. नगराध्यक्ष पदासह २५ नगरसेवक निवडून आणत आ. अब्दुल सत्तार यांनी एकहाती सत्ता राखली. तर भाजपचे ३ नगरसेवक निवडून आले. तशी स्थापनेपासून दोन-तीन वर्षांचा कार्यकाळ वगळता या नगरपरिषदेवर आ. सत्तारांचे वर्चस्व राहिलेले आहे. गेल्या निवडणुकीत आ. सत्तारांचे २४, तर भाजपचे २ नगरसेवक निवडून आले होते. या निवडणुकीत २ नगरसेवकांच्या जागा वाढलेल्या असून, १ जागा शिवसेनेची तर १ जागा भाजपची वाढली.
निवडणूक जाहीर झाल्यापासून प्रभाग क्र. ४, ५ व ८ चर्चेत होते. या प्रभागांमध्ये शिवसेनेसह भाजपने मोठी ताकद लावली होती. यात गेल्या निवडणुकीत प्रभाग क्र. ४ मधून भाजपच्या २ महिला नगरसेविका निवडून आल्या होत्या. या निवडणुकीत मात्र या प्रभागात भाजपच्या उमेदवारांचा पराभव झाला. दोन्ही पक्षांच्या प्रतिष्ठेच्या प्रभाग ८ मध्ये बाजी मारत भाजपने गड सर केला. या प्रभागात भाजपचे कमलेश कटारिया, रेखा गणेश भूमकर निवडून आले.
गेल्या निवडणुकीत या प्रभागात भाजपचा पराभव झाला होता. एकंदरीत या निवडणुकीचा निकाल शिवसेना-भाजप या दोन्ही पक्षांसाठी कही खुशी कही गम देणारा ठरला. भाजपला ५ ते ७तर शिवसेनेला नगराध्यक्षपदासह सर्व २८ नगरसेवक निवडून येण्याची शाश्वती होती. मात्र ३ नगरसेवक निवडून आल्याने हा निकाल भाजपला धक्का देणारा ठरला. तर शिवसेनेला प्रतिष्ठेच्या जागी पराभव झाल्याने मिळालेला विजय कही खुशी कही गम देणारा ठरला.
सुनील मिरकर दोन मतांनी पराभूत
प्रभाग क्र. ५ मध्ये भाजप-शिवसेनेत चुरशीची लढत झाली. यात भाजपच्या स्नेहल स्वप्नील शिनगारे व शिवसेनेचे सुधाकर पाटील विजयी झाले. भाजपचे सुनील मिरकर यांचा अवघ्या २ मतांनी पराभव झाला. सुनील मिरकर यांनी फेरमतमोजणी केली. यात त्यांना २ मतांनी पराभव स्वीकारावा लागला. शिवसेनेचे सुधाकर पाटील सलग दुसऱ्यांदा विजयी झाले.
भाजपची मते घटली
गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत मूळ भाजपचे असलेले सुरेश बनकर यांनी हाती मशाल घेतली होती. त्यांना शहरात पावणेअकरा हजारांच्या जवळपास मते पडली होती.
या निवडणुकीत भाजपच्या कमळ निशाणीवर निवडणूक लढूनही नगराध्यक्षपदाचे उमेदवार मनोज मोरेल्लू यांना जवळपास पावणेआठ हजार मते पडली. विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत भाजपची तीन हजार मते घटली आहे. तर ताकदीने निवडणूक लढूनही न मिळालेला अपेक्षित विजय भाजपला आत्मचिंतन करायला लावणारा आहे.