

Only two out of seven maize centers are operational in Kannada taluka.
कन्नड पुढारी वृत्तसेवा :
तालुक्यातील तालुका खरेदी-विक्री संघ आणि सहा शासकीय केंद्रांवर २९ नोव्हेंबरपासून हमीभावाने मका खरेदीसाठी शेतकऱ्यांची नोंदणी सुरू करण्यात आली आहे. मात्र प्रत्यक्षात तालुका खरेदी-विक्री संघ आणि श्री स्वामी समर्थ कामगार सहकारी संस्था, पळसगाव ही फक्त दोनच केंद्रे सुरू असून, उर्वरित केंद्रांवर प्रक्रिया ठप्प आहे.
सध्या सुरू असलेल्या या दोन केंद्रांवर आतापर्यंत १५१ शेतकऱ्यांची नोंदणी पूर्ण झाल्याची माहिती खरेदी-विक्री संघाचे सचिव कृष्णाराव काळे यांनी दिली. बाजारात मकाला अपेक्षित दर न मिळाल्याने शेतकरी हतबल झाले होते. शेतकऱ्यांच्या मागणीनंतर शासनाने मकाला २,४०० रुपये प्रति क्विटल हमीभाव जाहीर केला असून, त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
हमीभावाने मका विकण्यासाठी तालुक्यातील शेकडो शेतकरी, महिला शेतकरी नोंदणीसाठी केंद्रांवर गर्दी करत आहेत. दररोज सकाळी कार्यालय उघडण्यापूर्वीच रांगा लागत आहेत. मात्र इंटरनेट सतत ठप्प होणे व संकेतस्थळ चालू न राहिल्याने नोंदणी प्रक्रियेला मोठा विलंब होत आहे. तासन्तास प्रतीक्षा करूनही नोंदणी न झाल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे. प्रशासनाने याकडे लक्ष देऊन नियोजन करावे अशी मागणी होत आहे.
नोंदणीची अंतिम मुदत १५ डिसेंबर
आतापर्यंत केवळ १०६ शेतकऱ्याची नोंदणी पूर्ण झाली असून अजूनही शेकडो शेतकरी प्रतिक्षेत आहेत. शेतकऱ्यांना देयक थेट राष्ट्रीयीकृत बँक खात्यात जमा करण्यात येणार असून कोणतेही रोखी व्यवहार होणार नाहीत. नोंदणीची अंतिम मुदत १५ डिसेंबर निश्चित करण्यात आली असून पात्र शेतकऱ्यांनी आवश्यक कागदपत्रांसह नोंदणी लवकरात लवकर करावी, असे आवाहन खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर निकम यांनी केले आहे.