

4 workers' huts gutted in fire
वाळूज महानगर, पुढारी वृत्तसेवा :
परिसरात मिळेल ते काम करून कुटुंबासह राहणाऱ्या कामगारांच्या झोपड्यांना अचानक आग लागून एका झोपडीमधील गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. सुदैवाने यावेळी झोपड्यांमध्ये कुणी नसल्याने मोठी दुर्घटना टळली. मात्र आगीच्या या घटनेत चार झोपड्या जळून खाक झाल्या. ही घटना सोमवारी (दि.८) सकाळी वाळूज औद्योगिक क्षेत्रातील ई सेक्टमधील एका मोकळ्या भूखंडावर घडली. शॉर्टसर्किट होऊन ही आग लागली असावी, असा अंदाज अग्निशमन विभागाने व्यक्त केला आहे.
याविषयी मिळालेल्या माहितीनुसार वाळूज औद्योगिक क्षेत्रातील ई सेक्टर प्लॉट क्रमांक-११७ च्या पश्चम बाजूस असलेल्या मोकळ्या भूखंडावर शामराव धोत्रे, तुकाराम शिंदे, संजय धोत्रे, सुरज धोत्रे, विष्णू पवार व शेठीबा शिंदे हे सहा कामगार गेल्या अनेक वर्षापासून कुटुंबासह पालवजा झोपडी टाकून राहतात. सोमवारी सकाळी घरातील सर्व जण नेहमीप्रमाणे कामला तर मुले शाळेत गेली होती.
पावणे अकरा वाजेच्या सुमारास अचानक तुकाराम शिंदे यांच्या झोपडीला आग लागली. झोपडीला आग लागल्याचे पाहून रेश्मा पवार या मुलीने मदतीसाठी आरडाओरड सुरू केली. मात्र कोणी मदतीला येण्यापूर्वी झोपडीवरील ताडपत्री व लाकडी बल्ल्यांनी पेट घेतला. क्षणार्धात आगीने रौद्ररूप धारण करून लगतच्या शामराव, संजय तसेच सुरज यांच्या झोपड्यांना विळखा घातला. आगीमुळे तुकाराम यांच्या झोपडी मधील गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. सुदैवाने सर्व लहान मुले शाळेत गेली होती. दरम्यान आगीची माहिती मिळताच आग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत आर्धा तासाच्या परिश्रमानंतर आग विझविली. मात्र तोपर्यंत चार झोपड्य पूर्णपणे जळून खाक झाल्या होत्या.
रोख रकमेसह संसारोपयोगी वस्तू भस्मसात
शामराव धोत्रे यांनी मेव्हणीच्या लग्नासाठी आणलेले पैसे, तुकाराम शिंदे, सुरज धोत्र व संजय धोत्रे यांनी पोटाला चिमटा घेऊन साठविलेले असे एकूण ८० ते ९० हजार रुपये तसेच संसारोपयोगी वस्तू या आगीत जळून भस्मसात झाले आहे. या घटनेत झोपड्यांसह धान्य, कपडे आदी सर्वच सामाना जळाल्याने हे कुटुंब उघड्यावर आले आहे.