

Only 42 percent crop loan distribution in the district
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा: खरीप हंगामात जिल्ह्यात आतापर्यंत उद्दिष्टाच्या केवळ ४२ टक्केच पीक कर्ज वाटप झाले आहे. अनेक शेतकऱ्यांचे मागील पीक कर्जाचे नूतनीकरण व्हावयाचे बाकी आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना वेळेत पीक कर्ज उपलब्ध व्हावे यासाठी बँकांनी गावपातळीवर शिबिरांचे आयोजन करावे. तसेच १५ जुलैपर्यंत पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट पूर्ण करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी मंगळवारी बँकांच्या प्रतिनिधींना दिल्या.
जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी मंगळवारी पीक कर्ज वाटपाबाबत आढावा बैठक घेतली. बैठकीला जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था समृत जाधव, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक प्रेषित मोघे, उषा पवार यांच्या विविध बँकांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
सन २०२५ साठी जिल्ह्यात १ लाख ५४ हजार ७७० खातेदारांना १५९६ कोटी ६३ लक्ष रुपयांचे पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट आहे. त्यापैकी आतापर्यंत ६३० कोटी ५५ लक्ष रुपये इतकेच म्हणजेच ४२ टक्के पीक कर्ज वाटप झाले असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली.
यावर बँकांच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, अद्याप जिल्ह्यातील १ लाख ८७ हजार ९१२ शेतकऱ्यांच्या पीक कर्जाचे नुतनीकरण व्हावयाचे बाकी आहे. त्यामुळे नव्याने पीक कर्ज देण्यात अडचणी निर्माण होत आहे, असे सांगितले. त्यावर जिल्हाधिकारी स्वामी यांनी बँक अधिकाऱ्यांना विविध सूचना केल्या. जिल्ह्यात शेतकऱ्यांना वेळेत पीक कर्ज उपलब्ध होणे महत्त्वाचे आहे.
पीक कर्ज नूतनीकरणाबाबत शेतकऱ्यांना व्यवस्थित माहिती दिली जावी. ज्या गावात ज्या बँकेचे खातेदार असतील त्या गावात संबंधित बँकेने पीक कर्जासंदर्भात शिबीर आयोजित करावे. या शिबिरात गावपातळीवरील महसूल, कृषी, जिल्हा उपनिबंधक इ. विभागांचे अधिकारीही सहभागी होतील.
त्या गावातील शेतकऱ्यांचे पीक कर्जाचे नूतनीकरण करून लगेचच त्यांना पीक कर्ज उपलब्ध करुन द्यावे, अशा सूचना जिल्हाधिकारी स्वामी यांनी यावेळी केल्या.
जिल्ह्यात पीक कर्ज वितरण पूर्ण होत नाही तोवर बँकांसाठी पोलिस बंदोबस्त वा पेट्रोलिंग व्यवस्था उपलब्ध करून देण्याबाबतही प्रशासन विचार करत असल्याचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी म्हणाले.
शेतकऱ्यांकडे ३४७ कोटी रुपयांचे पीक कर्ज थकीत आहे. त्यातील २ लाख ३ हजार शेतकरी नूतनीकरणाचे बाकी आहेत. त्यांच्याकडून १८२ कोटी रुपये कर्ज थकीत आहे. त्यामुळे कर्ज पुनर्गठणावर भर देण्यात येत असल्याचे यावेळी बँक अधिकाऱ्यांनी सांगितले.