

Officials inspect damaged crops, farmers suffer huge losses
वडीगोद्री, पुढारी वृत्तसेवा: वडीगोद्रीसह परिसरात झालेल्या ढगफुटीसदृश पावसामुळे खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानीची पाहणी सोमवार दि. १५ रोजी अप्पर जिल्हाधिकारी रिता मैत्रेवार यांनी केली.
यावेळी उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी, अंबडचे तहसीलदार विजय चव्हाण, तालुका कृषी अधिकारी बी. आर. गंडे, यांची उपस्थिती होती.
यावेळी पथकाने वडीगोद्री, नालेवाडी, अंतरवाली सराटी, गहिनीनाथनगर, महाकाळा, साष्ट पिंपळगाव, आ-पेगाव या शिवारातील नुकसानग्रस्त सोयाबीन, कपाशी, तूर आदी पिकांची पाहणी केली. यावेळी मंडळाधिकारी संदीप नरोटे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुरेश काळे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते. अंबड तालुक्यातील वडीगोद्री महसूल मंडळ मध्ये शनिवारी रात्री १८५.३ मिलीमीटर अतिवृष्टी झाली.
या ढगफुटीसदृश पावसामुळे परिसरातील सर्वच नदी नाल्यांना मोठा महापूर आला होता. सोयाबीन, तूर, कपाशी, बाजरी तसेच डाळिंब मोसंबीच्या फळबागा याचे मोठे नुकसान झाल्याने या अधिकाऱ्यांनी या नुकसानग्रस्त पिकांचे पाहणे केली. महाकाळा, गहिनीनाथनगर शिवारातील शेतकऱ्यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्या हलगर्जीपानामुळे दरवर्षी शेकडो एकरवरील पिकांची नासाडी होत असल्याचे गाऱ्हाणे जिल्हाधिकारी यांच्यासमोर मांडले. यावर त्यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्याशी पत्रव्यवहार करून केले जातील, अशी ग्वाही दिली.
साष्ट पिंपळगाव व आपेगाव या परिसरातील चांद सुरा नाल्याच्या पाण्यामुळे शेकडो एकरवरील पिके पाण्याखाली गेली आहेत. नाल्याच्या सरळीकरण, खोलीकरण व रुंदीकरणाचे प्रस्ताव तयार करण्याचे आदेश त्यांनी उपविभागीय अधिकारी तसेच तहसीलदार यांना दिले. पाण्याचे योग्य निचरा होण्यासाठी साठी चर खोदण्यासाठी व बांध बंधिस्तीचे मनरेगामधून प्रस्ताव पाठवण्याचे आवाहन रिता मेहेत्रेवार यांनी शेतकऱ्यांना केले.
नालेवाडी येथील मांगनी नदीला आलेल्या महापुरात एक आदिवासी कुटुंब अडकले होते. प्रशासनाने त्या कुटुंबातील सर्व ८ व्यक्तींना रेस्क्यू केले. त्या ठिकाणी रीता मेहेत्रेवार यांनी भेट देऊन पूर परिस्थितीची पाहणी केली. तसेच याच नदीच्या पुरामुळे अंतरवाली सराटी, गहिनीनाथ नगर परिसरातील नुकसानग्रस्त पिकांची पाहणी केली.