

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्त-सेवा : लालपरी पाठोपाठ नुकत्याच दाखल झालेल्या ई-बसच्याही ब्रेक डाऊनच्या घटना घडत आहेत. रविवारी (दि.१४) पुणे मार्गावर धा-वणारी ई-बस ब्रेक डाऊन झाली. तिच्या बॅटरी वायरिंगमध्ये स्पार्किंग झाल्याने बस रस्त्यातच बंद पडली. प्रवाशांना दुसऱ्या वाहनाने रवाना करावे लागले.
अनेकदा लालपरी चालता चालता बंद पडण्याच्या घटना समोर आल्या आहेत. नुकत्याच दाखल ई-बसही अचानक बंद पडल्याची घटना पुणे मार्गावर घडली. मध्यवर्ती बसस्थानकातून १३ शिवाई ई-बस पुणे मार्गावर सेवा देत आहेत. ही सेवा खासगी कंपनीच्या वतीने देण्यात येत आहे.
रविवारी मुख्य बसस्थानकातून एक ई-बस पुण्यासाठी रवाना झाली. दरम्यान, येथून ७० किलोमीटरच्या पुढे गेल्यानंतर तिच्या बॅटरीच्या जवळून धूर निघून ती अचानक बंद पडली. धूर निघत असल्याचे पाहून चालकाने बस तात्काळ बाजूला घेत थांबवली. त्याने पाहणी केली असता बॅटरीच्या वायरिंगला स्पार्किंग झाल्याचे आढळून आले. दरम्यान प्रवाशांना इतर बसमध्ये पुढील प्रवासासाठी रवाना करण्यात आले.
ई-बसच्या दुरुस्तीचे काम संबंधित कंपनीकडेच असल्याने कंपनीच्या सोयीनुसार ही दुरुस्ती करण्यात येते. या दरम्यान मात्र एसटीच्या प्रवाशांना अनेक अडचणींचा सामना करावा लागणार आहे. नुकत्याच आलेल्या बसमध्ये आतापासूनच अशा अडचणी येत असल्याने येणाऱ्या दिवसांत ई-बसची सेवा कितपत पूरक ठरणार आहे, याबाबत प्रवाशांत उलट सुलट चर्चा सुरू आहे.